– फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची जंतर-मंतरवर नवी क्रांती
– आंदोलनाला नवी दिशा, शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा बुलंद संदेश
The Exposer
नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी व युवकांच्या आंदोलनाने आता केवळ शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, तर सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाचीही चाहूल दिली आहे. या आंदोलनात युवकांसोबत तरुणी आणि महिलांचा वाढता सहभाग हा देशाच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचा महत्त्वाचा संकेत ठरत आहे.
याच आंदोलनाचे प्रतीक ठरू शकेल असे एक प्रभावी चित्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मुठ उंचावत निर्धाराने पुढे जाणारी एक तरुणी आणि तिच्या मागे उभे असलेले असंख्य युवक-युवती हे दृश्य केवळ आंदोलनाचे चित्र नसून, शिक्षण, समानता, संविधान आणि स्वाभिमानासाठी नव्या पिढीने दिलेल्या लढ्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. या छायाचित्रातून भीतीवर मात करून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा, महिलांच्या नेतृत्वाचा आणि सामूहिक परिवर्तनाचा संदेश अधोरेखित होताना दिसतो.
मुंबईतील प्रसिद्ध कवी विवेक मोरे यांच्या काही ओळी या बदलत्या वास्तवाचे नेमके चित्र उभे करतात—
“फुले, शाहू, आंबेडकरांच्या जंतरमंतरची जादू आता घडू लागलेय,
आणि…
सातच्या आत घरात असणारी माझी लेकसुद्धा मैदानात बिनधास्त लढू लागलेय!”
या ओळी केवळ कविता नाहीत, तर भारतीय समाजात घडत असलेल्या वैचारिक परिवर्तनाची जिवंत साक्ष आहेत. ज्या मुलींना कधीकाळी घराच्या चौकटीत राहण्याची अपेक्षा केली जात होती, त्या आज संविधान, शिक्षण, समानता आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरून निर्भयपणे आवाज उठवत आहेत.

या परिवर्तनामागे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी आणि शिक्षणप्रधान विचारांची प्रेरणा असल्याचे आंदोलनात सहभागी अनेक युवक-युवती सांगतात. स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समान संधी यांचा पाया या महापुरुषांनी घातला आणि त्याच विचारांची प्रचिती आजच्या आंदोलनात दिसून येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” आजही तितकाच प्रेरणादायी आणि जिवंत आहे. शिक्षण माणसाला केवळ रोजगारासाठी सक्षम करत नाही, तर अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारण्याची हिंमत, संविधानिक मूल्यांचे भान आणि स्वाभिमानाने जगण्याची ताकद देते. त्यामुळे शिक्षित युवक आणि युवती शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात संघटितपणे उभे राहत असल्याचे चित्र देश पाहत आहे.
विशेष म्हणजे, आंदोलनातील महिलांचा सहभाग हा केवळ उपस्थितीपुरता मर्यादित नसून नेतृत्वाच्या भूमिकेतही दिसून येत आहे. उंचावलेली मुठ ही कोणत्याही संघर्षाची हिंसक नव्हे, तर संविधानिक मार्गाने न्याय, समता आणि अधिकारांसाठी लढण्याच्या निर्धाराची खूण असल्याचा संदेश हे चित्र प्रभावीपणे देताना दिसते.
जंतर-मंतरवरील आंदोलनाने हे स्पष्ट केले आहे की, आजची तरुण पिढी संघर्षाला घाबरत नाही. घराच्या चौकटी ओलांडून सार्वजनिक प्रश्नांवर भूमिका घेणारी तरुणी ही नव्या भारताची ओळख बनत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











