– गुंतवणुकीची रक्कम परत मागताच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी; सोनेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : शेअर बाजार आणि बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर रक्कम परत मागणाऱ्या गुंतवणूकदारालाच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्रद्धानंदपेठ येथील श्रीकृष्ण रामदेव आवास येथे राहणाऱ्या प्रफुल्ल बुटी (वय ५९) याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार राकेश वासुदेवराव डेकाटे (वय ४८) हे प्रॉपर्टी डीलर आहेत. दोन्ही कुटुंबांची मुले एकाच ठिकाणी शिक्षण घेत असल्याने २०१७ मध्ये दोन्ही कुटुंबांची ओळख झाली होती. या परिचयाचा फायदा घेत आरोपी बुटी याने शेअर बाजार आणि बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, २०१९ ते २०२० या कालावधीत डेकाटे यांनी आरोपीकडे तब्बल १.५० कोटी रुपये गुंतवणुकीसाठी दिले. सुरुवातीला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, त्यानंतर गुंतवणुकीची मूळ रक्कम परत मागितल्यानंतर आरोपीकडून टाळाटाळ सुरू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
११ सप्टेंबरला पिस्तूल दाखवून धमकी!
११ सप्टेंबर रोजी डेकाटे हे आरोपीच्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी आपली गुंतवणुकीची रक्कम लवकर परत करण्याची मागणी केली. यावेळी आरोपीने टेबलवर पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
लाखो-कोटींच्या व्यवहारामागे आणखी कोण?
तक्रारदार डेकाटे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने लाडीगोडी लावून गुंतवणुकीची रक्कम स्वतःकडे घेतली आणि नंतर राजकीय व्यक्तींच्या नावांचा वापर करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पैसे परत मागणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आरोपीने यापूर्वीही अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर डेकाटे यांनी सोनेगाव पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रफुल्ल बुटी याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आता पोलिसांच्या तपासात १.५० कोटींच्या गुंतवणुकीचा नेमका व्यवहार, पैशांचा विनियोग, कथित धमकीसाठी वापरलेले पिस्तूल आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















