इसासनीच्या आठवडी बाजाराला अतिक्रमणाचा विळखा…अखेर हटला!

– सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आशिष गोंडाणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामपंचायतीची जेसीबीद्वारे धडक कारवाई

The Exposer
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून इसासनी गावातील आठवडी बाजाराला विळखा घालणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने हातोडा चालवला. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आशिष गोंडाणे यांनी या गंभीर समस्येविरोधात केलेल्या सातत्यपूर्ण तक्रारी आणि पाठपुराव्याला अखेर यश आले. ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविल्याने आठवडी बाजाराने मोकळा श्वास घेतला आहे.

इसासनी येथील आठवडी बाजार हा परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बाजाराच्या जागेवर अनधिकृत दुकाने व बांधकामे वाढल्याने बाजाराचे नियोजन कोलमडले होते. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती. परिणामी, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह महिलांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आशिष गोंडाणे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई केली.

सरपंच अरविंद ढोणे यांच्या नेतृत्वात उपसरपंच राहुल कुळसंगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र देशमुख आणि तलाठी संजय हेलोंडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मीना मेश्राम, उषा प्रधान, इंदूबाई चौधरी, सिद्धार्थ बागडे आणि ज्योत्स्ना रहांगडाले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल्याने बाजार परिसरातील अडथळे दूर झाले आहेत. या कारवाईमुळे बाजाराचे सुयोग्य नियोजन, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आशिष गोंडाणे यांच्या लोकहितवादी पाठपुराव्याचे तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More