नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएससी पॅरामेडिकल प्रवेशाची घोषणा; १२ शाखांमध्ये प्रवेशाची संधी!

– तीन वर्षांचा अभ्यासक्रम, एक वर्षाची आंतरवासिता; ९ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

The Exposer
नागपूर : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (GMC) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील विविध १२ शाखांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून त्यानंतर एक वर्षाची आंतरवासिता (इंटर्नशिप) अनिवार्य आहे. त्यामुळे एकूण चार वर्षांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.

१२ विविध शाखांमध्ये शिक्षणाची संधी

महाविद्यालयाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार रेडिओग्राफी, रेडिओथेरपी, ऑपरेशन थिएटर, लॅबोरेटरी, फॉरेन्सिक सायन्स, परफ्युजनिस्ट, कार्डिओलॉजी, ऑप्टोमेट्री, अँडोस्कोपी, ब्लड ट्रान्सफ्युजन, कम्युनिटी मेडिसिन आणि इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस या शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवार भारतीय नागरिक असणे, महाराष्ट्राचा अधिवासी असणे आणि जाहिरातीत नमूद केलेल्या जन्मतारखेच्या अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. दहावी व बारावीचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातील संस्थांमधून पूर्ण केलेले असावे. बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

९ नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया

इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बीएससी-पीएमटी अॅडमिशन या लिंकद्वारे प्रवेश अर्ज भरायचा आहे. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे :

– अर्ज सादर करणे : ९ ते १८ नोव्हेंबर २०२६.

– तात्पुरती गुणवत्ता यादी : २३ नोव्हेंबर २०२६.

– गुणवत्ता यादीवरील हरकती : २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत.

– अंतिम गुणवत्ता यादी : २५ नोव्हेंबर २०२६.

– प्रथम निवड यादी : २५ नोव्हेंबर २०२६.

– प्रवेश निश्चिती : २५ ते २७ नोव्हेंबर २०२६.

प्रवेशासाठी आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि शुल्काचा डिमांड ड्राफ्ट निर्धारित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम कट ऑफ तारीख ३० नोव्हेंबर २०२६ अशी नमूद करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी

प्रवेशासंबंधी अर्जाचा नमुना, उपलब्ध जागा, आरक्षणनिहाय तपशील, अटी व शर्ती आणि आवश्यक प्रमाणपत्रांचे नमुने महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (संकेतस्थळ : www.gmcnagpur.org) वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांव्यतिरिक्त पॅरामेडिकल तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More