– नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक बळकटीची जबाबदारी; सामाजिक न्यायाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
The Exposer
नागपूर : भीम आर्मी – भारत एकता मिशनच्या नागपूर शहर संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव नेहाताई राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांमुळे नागपूर शहरात संघटनेची ताकद वाढण्यासोबतच सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला नागपूर शहर सहप्रभारी डॉ. वंदना इंगळे, नागपूर जिल्ह्याच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिलाताई वासनिक, पौर्णिमा वानखेडे, सचिव गीता धुळे आणि कोषाध्यक्ष वंदना टेंभुर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत नागपूर शहर कार्यकारिणीमध्ये अरविंद पाटील यांची शहराध्यक्षपदी, तर उमेश काळे यांची शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच अरविंद नागदेवे यांची शहर उपाध्यक्षपदी, विनोद मुनेश्वर यांची शहर महासचिवपदी, महेशकुमार शहारे यांची शहर मीडिया प्रभारीपदी आणि जे. पी. गावंडे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने संघमित्रा डांगे यांच्याकडे उमरेड तालुका अध्यक्षपदाची, तर सविता डोंगरे यांच्याकडे रामेश्वरी शाखा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भीम आर्मीच्या ध्येयधोरणांचा, विचारधारेचा आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेचा व्यापक प्रचार करावा. संविधानिक मूल्ये, समता, बंधुता आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे कार्य करून संघटनेचा विस्तार करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून नागपूर शहरात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
Author: संतोष तायडे
संपादक















