पत्रकार विजय खवसे प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना दुसरी नोटीस!

– १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश; दोन स्मरणपत्रांनंतरही पोलिसांचा अहवाल आयोगाला अप्राप्त

The Exposer
नागपूर : पत्रकार विजय सीताराम खवसे यांच्याशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नागपूर पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा नोटीस (Reminder-II) बजावली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या कथित गुन्ह्यात विनाकारण गोवल्याचा आरोप आणि पोलीस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात खवसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणात नागपूर पोलीस आयुक्तांना दुसरे स्मरणपत्र (Reminder-II) पाठवून १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक डॉ. जी. सुनील कुमार बाबू यांच्या स्वाक्षरीने ९ नोव्हेंबर २०२६ रोजी हे स्मरणपत्र जारी करण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोगाने नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले होते. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी पहिले स्मरणपत्रही पाठविण्यात आले. मात्र, निर्धारित कालावधी उलटूनही आयोगाला अपेक्षित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे दुसऱ्या स्मरणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे आयोगाने पुन्हा एकदा नागपूर पोलीस आयुक्तांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधत आवश्यक कार्यवाही करण्याचे आणि स्मरणपत्र प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोनदा स्मरणपत्र, तरीही अहवाल नाही!

पत्रकार विजय सीताराम खवसे यांनी सीताबर्डी पोलिसांकडून दाखल गुन्ह्यात कारण नसतांना गोवल्या प्रकरणी तसेच पोलीस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे न्यायाची मागणी केली आहे. आयोगाने मूळ पत्र आणि त्यानंतर दोन स्मरणपत्रांच्या माध्यमातून अहवाल मागविला असतानाही तो प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘न्याय मिळेपर्यंत घटनात्मक लढा सुरूच!’

आयोगाच्या दुसऱ्या स्मरणपत्रानंतर विजय सीताराम खवसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ही लढाई केवळ माझ्या वैयक्तिक न्यायाची नसून संविधानाने दिलेले अधिकार, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानासाठी आहे. अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यास त्याविरोधात घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने लढणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. न्याय मिळेपर्यंत शेवटच्या प्रयत्नापर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आता पोलीस आयुक्तांच्या उत्तराकडे लक्ष!

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठवून १५ दिवसांची मुदत दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन स्मरणपत्रांनंतरही अहवाल आयोगापर्यंत का पोहोचला नाही? नागपूर पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कार्यवाही करणार? तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का? तसेच पत्रकार विजय खवसे यांना न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याप्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More