प्रेमाच्या आणाभाका, लग्नाचे आमिष अन् देहव्यापाराचा काळा धंदा!

– प्रेमाच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त
– वर्ध्यातील धक्कादायक प्रकार; पोलिसांच्या बनावट ग्राहकाच्या सापळ्यात प्रियकर रंगेहात जेरबंद

The Exposer
वर्धा : प्रेम, विश्वास, लग्नाची स्वप्ने आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका… या सगळ्यांवर विश्वास ठेवून एका २१ वर्षीय तरुणीने आपले सर्वस्व प्रियकराच्या स्वाधीन केले. मात्र, ज्या व्यक्तीला ती आयुष्याचा जोडीदार मानत होती, त्याच प्रियकराने दारूच्या व्यसनासाठी तिच्या आयुष्याचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला आहे. प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेला हा प्रवास अखेर देहव्यापाराच्या दलदलीपर्यंत पोहोचला. पोलिसांच्या छाप्यात या तरुणीची सुटका झाली असली, तरी तिच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाला.

वर्धा शहरातील आर्वी नाका परिसरातील कारला रोडवरील दर्श रेसिडेन्सी येथे हा प्रकार उघडकीस आला. तुषार प्रमोद फुलकारी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका नामांकित महाविद्यालयात एम.एस्सीचे शिक्षण घेत होता. त्याच महाविद्यालयात पुलगाव येथील २१ वर्षीय तरुणी (नाव बदललेले) बी.एस्सीचे शिक्षण घेत होती.

इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर

इन्स्टाग्राम आणि मोबाईलवरील संभाषणातून दोघांची ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या या तरुणीला तुषारच्या रूपाने आपलेपणा आणि प्रेम मिळाल्याचा भास झाला. त्यामुळे तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. दोघांनीही एकत्र जगण्यामरण्याच्या आणाभाका घेतल्या. प्रेमविवाह करून सुखी संसार थाटण्याची स्वप्ने रंगविली. तुषारच्या एका फोनवर ती त्याला भेटण्यासाठी धाव घेत होती.

दारूच्या व्यसनाने प्रेमसंबंधाला काळी किनार

तुषारला दारूचे व्यसन जडले. बेरोजगार असलेल्या तुषारने तरुणीकडे पैशांची मागणी सुरू केली. त्याच्या प्रेमापोटी तिने स्वतःजवळील पैसे त्याच्यावर खर्च केले. दारूचे व्यसन भागविण्यासाठी तुषार कर्ज आणि उसनवारी करू लागला. दरम्यान, तुषारच्या प्रेमाखातर तरुणीने आपले शिक्षणही सोडले होते. लग्नाचे आश्वासन पूर्ण होईल, या अपेक्षेने ती त्याच्यासोबत राहिली.

मित्रांच्या नावाखाली शरीरसंबंधांसाठी दबाव

दारूच्या व्यसनासाठी पैशांची गरज वाढताच तुषारने कथितपणे तरुणीवर त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मित्रांकडून घेतलेल्या पैशांच्या बदल्यात तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. प्रेमाच्या नात्यात पूर्णपणे गुंतलेल्या तरुणीला सुरुवातीला या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही. पुढे तुषारने तिला देहव्यापार करण्यासही बाध्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

पोलिसांचा बनावट ग्राहक अन् प्रियकराचा पर्दाफाश

तुषारकडून तरुणीला देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती एसएसबीचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील आणि पोलिस हवालदार प्रकाश माथनकर यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास छत्रपती चौकात तुषारने बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारले आणि तरुणीला त्याच्यासोबत पाठविले. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घातला. तुषार आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून तुषारला अटक करण्यात आली. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्क्यात गेलेल्या तरुणीला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करून एका तरुणीला देहव्यापाराच्या जाळ्यात ओढल्याचा हा प्रकार समाजमन सुन्न करणारा आहे. ज्या हातात लग्नाची स्वप्ने सोपविली, त्याच हातांनी तिच्या आयुष्याचा सौदा केल्याचा आरोप समोर आल्याने प्रेमाच्या नात्यालाच काळिमा फासला गेला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More