बेसा नगरपंचायतीला मिळणार १८ कोटींचे ‘प्रशासकीय वैभव’!

– २२ हजार चौरस फुटांत साकारणार भव्य इमारत; एकाच छताखाली ससभागृहासह सर्व विभाग, नागरिकांची कार्यालयीन धावपळ संपणार

The Exposer
नागपूर : वेगाने विस्तारणाऱ्या बेसा परिसराच्या नागरी विकासाला आता आधुनिक प्रशासकीय वास्तूची जोड मिळणार आहे. बेसा नगरपंचायतीच्या नव्या प्रशासकीय भवनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून, २२ हजार चौरस फुटांच्या जागेत ही भव्य इमारत उभी राहणार आहे. प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच प्रत्यक्ष बांधकामाचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे बेसा नगरपंचायतीच्या कारभाराला आधुनिकतेची नवी झळाळी मिळणार आहे.

बेसा, बेलतरोडी, पिपळा आणि घोगली या चार गावांचा समावेश असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षांत नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. नव्या निवासी वसाहती, गृहप्रकल्प आणि वाढत्या लोकवस्तीमुळे प्रशासनावरील कामाचा ताणही वाढत आहे. मात्र, विविध विभागांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात. हीच गैरसोय दूर करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा एका छताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१८ कोटींच्या वास्तूत आधुनिक सुविधांचा समावेश!

प्रस्तावित प्रशासकीय भवन तब्बल २२ हजार चौरस फुटांचे असणार आहे. आधुनिक बांधकाम रचना आणि प्रशस्त कार्यालयीन व्यवस्थेसह साकारल्या जाणाऱ्या या इमारतीत सभागृह व नगरपंचायतीचे सर्व प्रमुख विभाग एकत्रित कार्यरत राहतील. कर विभाग, विद्युत विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी, आरोग्य विभाग, नगररचना, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागांसाठी स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था असेल.

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालने, तसेच विविध विषय समित्यांच्या सभापतींसाठी स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांच्या बैठका आणि प्रशासकीय समन्वयासाठीही आवश्यक सुविधा असतील.

एका इमारतीत संपूर्ण प्रशासन; नागरिकांना मोठा दिलासा!

सध्या एखाद्या कामासाठी नागरिकांना वेगवेगळ्या विभागांत जावे लागते. कर आकारणीपासून जन्म-मृत्यू दाखल्यांपर्यंत आणि पाणीपुरवठ्यापासून आरोग्यविषयक तक्रारींपर्यंत विविध कामांसाठी होणारी ही धावपळ नव्या इमारतीमुळे कमी होणार आहे. सर्व विभाग एकाच परिसरात उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होईल. तसेच विभागांमधील समन्वय वाढून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

वाढत्या बेसाच्या विकासाला प्रशासकीय बळ!

बेसा-पिपळा परिसराचा झपाट्याने विस्तार होत असताना स्थानिक प्रशासनासाठी सुसज्ज आणि स्वतंत्र प्रशासकीय भवन उभारणे ही काळाची गरज बनली होती. भविष्यातील वाढत्या नागरी गरजा लक्षात घेऊन या इमारतीची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ कार्यालयीन सुविधांपुरता मर्यादित न राहता बेसा परिसराच्या प्रशासकीय विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दुसरीकडे बेसा-पिपळा परिसराचा विकास बघता आणखी वेळाहरी, शंकरपूर, पेवठा, खरसोली व काही गावांचा समावेश करून नगरपरिषदेच्या दिशेने पाऊले टाकली जात असल्याचे संकेत याद्वारे दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्याधिकाऱ्यांकडून बांधकाम लवकर सुरू करण्याचे संकेत

बेसा-पिपळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय भवनासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेल्या स्वतंत्र प्रशासकीय भवनाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More