शहरातील बंगल्यांमध्ये आता ‘नेनो गाईं’ची एन्ट्री! बुटक्या गोवंशांची वाढती ‘क्रेझ’

– कमी जागा, शांत स्वभाव आणि घरच्या घरी गोसेवेची संधी
– स्वानप्रेमींनंतर आता गोप्रेमींचेही मिनी गोवंशांकडे आकर्षण

The Exposer
नागपूर : शहरातील बदलती जीवनशैली आणि पाळीव प्राण्यांविषयी वाढत असलेली आवड यामुळे आता नागपूरच्या बंगल्यांमध्ये एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होत आहे. काही वर्षांपूर्वी मोठ्या बंगल्यांमध्ये परदेशी जातींचे कुत्रे पाळण्याची क्रेझ होती. त्यानंतर मांजरांसह विविध पाळीव प्राण्यांनीही घरांमध्ये स्थान मिळवले. मात्र, आता या यादीत चक्क छोट्या आकाराच्या गाईंची भर पडत आहे. ‘नेनो गाय’ किंवा ‘मायक्रो मिनिएचर काऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्या गोवंशांविषयी पशुप्रेमी आणि गोप्रेमींमध्ये विशेष आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे मुळच्या आंध्र प्रदेशातील असलेल्या या नेनो गाईना सुद्धा महाराष्ट्र शासनाने ‘राज्य माते’चा दर्जा द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

विशेष म्हणजे, नागपुरातही अशा नेनो गाईंचे चाहते असून हनुमाननगरसह काही बंगल्यांमध्ये त्यांचे संगोपन केले जात असल्याचे चित्र आहे. केवळ धार्मिक भावना किंवा गोसेवेपुरता हा विषय मर्यादित नसून, त्यांचा लहान आकार, शांत स्वभाव आणि माणसांशी सहज जुळवून घेण्याची क्षमता यामुळेही त्यांच्याविषयी उत्सुकता वाढत आहे.

एक-दोन फुटांची उंची; दिवसाला दोन लिटरपर्यंत देते दूध

नेनो गाईंचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे त्यांचा अतिशय लहान आकार एखाद्या लहान श्वानाएवढ्या दिसत असल्याने त्यांना पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. विशेष म्हणजे, आकाराने लहान असूनही काही गाई दिवसाला साधारण एक ते दोन लिटरपर्यंत दूध देत असल्याची माहिती संबंधित गोशाळेकडून देण्यात आली आहे. त्यात सामान्य गाईच्या प्रमाणात या नेनो गाईच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण ही जास्त असते. या गाईंचा स्वभाव शांत, माणसांशी लवकर जुळवून घेणारा आणि तुलनेने मिलनसार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही पशुप्रेमी त्यांच्याकडे केवळ दूध देणारा पशू म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे पाहत आहेत.

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध देशी बुटक्या गोवंशाची जात

आंध्र प्रदेशातील चित्तूर परिसरातील प्रसिद्ध देशी बुटक्या गोवंशाची पुंगनूर ही जात आहे. तिची उंची साधारण ७० ते ९० सेंटीमीटरच्या आसपास असल्याचे संदर्भांमध्ये नमूद केले जाते.
विशेषतः गोसेवेची आवड असणाऱ्या; मात्र ज्यांच्याकडे मोठी गोशाळा किंवा शेतजमीन उपलब्ध नाही, अशा व्यक्तींमध्ये या छोट्या गोवंशांविषयी उत्सुकता वाढत आहे. घराच्या आवारात छोट्या गोवंशाचे संगोपन करता येईल, ही संकल्पनाच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. या छोट्या गोवंशांच्या किमतीबाबतही मोठी उत्सुकता आहे.या गौवंशाची किंमत १ लाखाजवळ असली तरी वंशावळ, वय, आकार, आरोग्य आणि उपलब्धता यानुसार ती बदलू शकते.

नागपूरमध्येही वाढली नेनो गाईंची क्रेझ!

नागपूरसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या शहरात मोठे बंगले, फार्महाऊस आणि स्वतंत्र अंगण असलेल्या घरांची संख्या लक्षात घेता भविष्यात नेनो गाईंचे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे. स्वानप्रेमींनंतर आता गोप्रेमींच्या घरांमध्येही छोट्या आकाराच्या देशी गोवंशांना स्थान मिळू लागल्याचे चित्र आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More