– बुटीबोरी ते भिवापूर मार्गावर पोलिसांचा थरारक पाठलाग; इकोस्पोर्टच्या डिक्कीत आढळले २.००३ किलो अफू, दोन वाहनेही जप्त
The Exposer
नागपूर : मध्यप्रदेशातून नागपूरच्या दिशेने अफूची वाहतूक करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या NDPS पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे सुरू झालेली ही कारवाई पोलिसांच्या पाठलागानंतर नांदा गावात संपली. संशयित इकोस्पोर्ट कारच्या डिक्कीत २.००३ किलो अफू आढळून आला. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, पाच मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल ३० लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना पाहताच वाहनांचा वेग वाढवला!
१५ नोव्हेंबर रोजी बुटीबोरी परिसरात NDPS पथक पेट्रोलिंग करीत असताना बोलेरो पिकअप किंवा इकोस्पोर्ट वाहनातून एक ते दोन किलो अफूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने बेला ते सार्शी मार्गावर शोधमोहीम सुरू केली. यावेळी संशयित दोन्ही वाहने दिसताच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकांनी वाहने भरधाव वेगाने भिवापूरच्या दिशेने पळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भिवापूर पोलिसांची मदत घेण्यात आली. अखेर नांदा गावात दोन्ही वाहने अडवून पोलिसांनी झडती घेतली.
इकोस्पोर्टच्या डिक्कीत अफूचे दोन बंडल!
वाहनांची तपासणी करताना इकोस्पोर्टच्या डिक्कीत एक किलो वजनाचे दोन बंडल आढळले. त्यातील घट्ट द्रवरूप अफूचे एकूण वजन २.००३ किलो असून त्याची किंमत १० लाख १ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हा अफू परवानाधारक शेतात लावलेल्या अफूच्या झाडांपासून मिळाल्याचा दावा केला. या दाव्याची सत्यता आणि अफूच्या वाहतुकीमागील संपूर्ण साखळी तपासाच्या केंद्रस्थानी राहणार आहे.
नीमच जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ जाळ्यात
पोलिसांनी पवन सत्यनारायण पाटीदार (३०) आणि लोकेशकुमार सत्यनारायण ऊर्फ कालिदास पाटीदार (३२), दोघेही रा. बसेडीभाटी, तहसील जावद, जिल्हा नीमच, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेतले आहे. पवन हा इकोस्पोर्टचा चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तस्करीचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान
या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल, दोन्ही आरोपी आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी भिवापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अफू नेमका कुठून आणण्यात आला, त्याची विक्री कुठे होणार होती, या वाहतुकीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, अजितसिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण भिमटे, पोलीस हवालदार प्रविण देव्हारे, प्रकाश ठोके, अमोल नागरे, अनिल खरडखेले, अविनाश तोडसाम तसेच भिवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे, स्वप्निल गेडाम, रोशन साहारे, सतीश राठोड आणि सायबर सेलच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
Author: संतोष तायडे
संपादक















