– नागपुरातील नामांकित JEE-NEET कोचिंग क्लासमधील धक्कादायक प्रकार; २५ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध POCSO आणि IT कायद्यान्वये गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. शहरातील एका नामांकित JEE आणि NEET कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, संबंधित शिक्षिका अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून सुरुवातीला सामान्य संदेश, त्यानंतर अश्लील विनोद आणि आक्षेपार्ह संदेश पाठवत होती. पुढे तिने स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध POCSO कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने जुलै महिन्यापासून काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवून संवाद सुरू केला. विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर हळूहळू तिच्या संदेशांचे स्वरूप बदलू लागले. सुरुवातीला अश्लील विनोद आणि आक्षेपार्ह मजकूर पाठवण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना स्वतःचे अश्लील फोटो, तर पुढे व्हिडिओ पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारचे संदेश पाठविल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
चाइल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीने प्रकार उघड
१३ नोव्हेंबर रोजी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर एका विद्यार्थ्याने संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. एका विद्यार्थ्याच्या पालकांच्या निदर्शनासही हा प्रकार आला होता. त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याकडे याबाबत माहिती दिली. त्यानंतर बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने दखल घेतली.
चाइल्ड हेल्पलाइन पथकातील पूजा कांबळे आणि मीनाक्षी धडाडे यांनी प्राथमिक चौकशी करून आवश्यक माहिती व पुरावे संकलित केले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे संबंधित शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
किती विद्यार्थी या प्रकाराला बळी?
या प्रकरणात बाधित झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्यात आले असून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान काही फोटो आणि व्हिडिओही आढळल्याची माहिती पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली.
कोचिंग क्लासच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह!
या घटनेमुळे खासगी शिकवणी वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादासाठी कोणती नियमावली आहे? अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कोचिंग संस्थांमध्ये स्वतंत्र बाल संरक्षण धोरण आहे का? शिक्षकांच्या वर्तनावर संस्थेचे नियंत्रण आणि देखरेख कशी ठेवली जाते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत अनेक शाळा आणि ट्युशन क्लासेसमध्ये बाल संरक्षण धोरणाचा अभाव असल्याकडे लक्ष वेधले आहे. पालकांनी मुलांच्या डिजिटल संवादाबाबत सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांशी होणाऱ्या अशा आक्षेपार्ह संवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोचिंग संस्थांनी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. आता या प्रकरणात आणखी किती विद्यार्थी बाधित झाले आहेत आणि संबंधित संस्थेची जबाबदारी काय, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















