खुर्सापार आरटीओ लाचकांडानंतर खळबळ! ‘सेटिंगबाज’ साखळीचा पर्दाफाश होणार?

– दलाल, मध्यस्थ आणि कथित पत्रकारांच्या भूमिकेवरही संशयाची सुई
– ५०० रुपयांच्या लाचेने उघडली भ्रष्टाचाराची पाळेमुळे; एसीबीच्या तपासातून आणखी मोठे मासे जाळ्यात येणार का?

The Exposer
नागपूर : खुर्सापार आरटीओ तपासणी नाक्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर संपूर्ण आरटीओ यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. मोटार वाहन निरीक्षक साजन शेंडे आणि खासगी एजंट यांच्याविरुद्ध नोंद झालेल्या लाचखोरी प्रकरणाने केवळ एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड केला नसून, या मागे कार्यरत असलेल्या कथित ‘सेटिंगबाज’ साखळीवरही संशयाचे ढग गडद झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरटीओ विभागातील व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या काही व्यक्तींसोबतच काही तथाकथित पत्रकारांची नावेही चर्चेत असल्याची चर्चा विविध स्तरांवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी जवळीक साधून माहितीची देवाणघेवाण, कारवायांची आगाऊ खबर आणि दबावतंत्राचा वापर होत असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

कारवाईची माहिती दडपण्याचे प्रयत्न?

एसीबीच्या कारवाईनंतर काही माध्यम प्रतिनिधींनी या प्रकरणातील माहिती आणि छायाचित्रे प्रसारित होऊ नयेत यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात जोर धरत आहे. जर या चर्चांमध्ये तथ्य आढळले, तर तो केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा राहणार नाही, तर पत्रकारितेच्या विश्वासार्हतेलाही तडा देणारा गंभीर प्रकार ठरू शकतो. यामुळे प्रामाणिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी असून, “भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत संगनमत करणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

५०० रुपयांची लाच; पण प्रश्न कोट्यवधींच्या अवैध वसुलीचा?

खुर्सापार चेकपोस्टवरील ५०० रुपयांच्या लाचप्रकरणी झालेली कारवाई ही केवळ हिमनगाचे टोक असल्याची चर्चा ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सुरू आहे. अनेक वर्षांपासून सीमावर्ती तपासणी नाक्यांवर अवैध वसुली होत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. त्यामुळे एसीबीच्या या कारवाईने जुन्या जखमा पुन्हा उघडल्या असून, संपूर्ण व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी वाढत आहे.ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, जर तपास निष्पक्षपणे झाला तर केवळ एक-दोन अधिकारी नव्हे, तर भ्रष्टाचाराला संरक्षण देणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होऊ शकतो.

‘मोठ्या माशां’पर्यंत तपास पोहोचणार का?

नागरिक आणि परिवहन क्षेत्राशी संबंधित घटकांची अपेक्षा आहे की, चौकशी केवळ लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांपुरती मर्यादित न राहता त्यामागील दलाल, मध्यस्थ, आर्थिक लाभार्थी आणि प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचावी. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक घटकाला कायद्याच्या चौकटीत आणल्याशिवाय अशा प्रकरणांना आळा बसणार नाही, अशी चर्चा आहॆ. सध्या एसीबीकडून तपास सुरू असून, या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होतात का आणि कथित ‘सेटिंगबाज’ नेटवर्कमधील कोणकोणती नावे समोर येतात, याकडे नागपूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विशेष

या प्रकरणात कथित पत्रकार किंवा इतर व्यक्तींबाबत सुरू असलेल्या चर्चा व आरोपांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तपास यंत्रणांकडून निष्कर्ष समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More