महाल दंगलीपासून ‘ऑपरेशन थंडर’पर्यंत; डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची अडीच वर्षांची कारकीर्द ठरली चर्चेचा केंद्रबिंदू!

– दंगलीचे आव्हान, गुन्हेगारीविरोधात आक्रमक मोहीम आणि अमली पदार्थ माफियांवर धडक कारवाया; नागपूर पोलिस दलाला दिली नवी धार

The Exposer
नागपूर : नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची सुमारे अडीच वर्षांची कारकीर्द अनेक कारणांनी चर्चेत राहिली. कायदा-सुव्यवस्थेच्या संवेदनशील आव्हानांपासून ते संघटित गुन्हेगारीविरोधातील कठोर कारवायांपर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे नागपूर पोलिस दलाची कार्यपद्धती अधिक गतिमान, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि परिणामकारक झाल्याची चर्चा आहे.

या कार्यकाळातील सर्वाधिक गाजलेली घटना म्हणजे महाल परिसरात उसळलेली दंगल. दुपारपासून सुरू झालेला दोन गटांतील तणाव सायंकाळनंतर हिंसक वळणावर गेला. दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचारात अनेक नागरिकांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झाला, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूरकडे वेधले गेले.

दंगलीनंतर पोलिसांनी व्यापक तपास मोहीम राबवून अनेक संशयितांना अटक केली. दंगलीचा कथित सूत्रधार मानल्या गेलेल्या काही आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. या संपूर्ण घटनेत परिस्थिती नियंत्रणात आणून शहरात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले.

याच कार्यकाळात राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन थंडर’ हे नागपूर पोलिसांच्या इतिहासातील महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानले जाते. अमली पदार्थ तस्कर, संघटित गुन्हेगार, माफिया आणि सराईत आरोपींविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.

एमडी, गांजा आणि इतर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. अनेक कुख्यात आरोपींना अटक झाली, तर काहींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात मोठी धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. याशिवाय खंडणीखोर, अवैध शस्त्रधारी, वाहनचोर टोळ्या, सायबर गुन्हेगार आणि विविध गुन्हेगारी टोळ्यांविरोधात सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला, तर प्रतिबंधात्मक कारवायांमुळे संभाव्य गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात आले.

कार्यक्षम पोलिसिंगवर भर

डॉ. सिंगल यांच्या कार्यकाळात तंत्रज्ञानाधारित पोलिसिंग, सीसीटीव्ही नेटवर्कचा अधिक प्रभावी वापर, रात्रीची गस्त, संवेदनशील भागांमध्ये वाढीव बंदोबस्त, महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिमा, वाहतूक व्यवस्थापनातील सुधारणा आणि नागरिकाभिमुख उपक्रम यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे शहरातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रतिसादक्षम झाल्याचे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले.

गुन्हेगारांवर वचक निर्माण

संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारत सातत्याने धडक कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे अनेक सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत कठोर संदेश गेला.

नागपूरने बरेच काही शिकविले

निरोप समारंभात डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही नागपूरबद्दल भावना व्यक्त करत, “नागपूरने मला बरेच काही शिकविले. शहराला अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त करण्याच्या प्रामाणिक हेतूने प्रत्येक मोहीम राबविली. सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीतून अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात करता आली,” असे सांगितले. त्यांनी बदलत्या गुन्हेगारीच्या स्वरूपानुसार पोलिसांनी तांत्रिक कौशल्य, मानसिक आणि शारीरिक तयारी सातत्याने वाढवत राहण्याची गरजही अधोरेखित केली.

आपल्या आयपीएस म्हणून ३२ वर्षांच्या सेवेत नागपूरमधील ही त्यांची १९ वी नियुक्ती होती. त्यांच्या कार्यकाळात २२ संघटित गुन्हेगार टोळ्यांवर, १२२ स्थानबद्धता प्रकरणांवर आणि १,५५० अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी निरोप समारंभात दिली.

आता नागपूर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात येत असताना, महाल दंगल, ऑपरेशन थंडर, संघटित गुन्हेगारीविरोधातील धडक कारवाया आणि तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगला दिलेली चालना यामुळे डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची अडीच वर्षांची कारकीर्द नागपूर पोलिसांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय म्हणून ओळखली जाईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More