भरधाव सिमेंट मिक्सरची दुचाकीला भीषण धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण जखमी

– पारडीतील भंडारा रोडवरील अपघाताने हळहळ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध

The Exposer
नागपूर : नागपूरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी भंडारा रोडवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत दुचाकीवर प्रवास करणारा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नगर येथील विवेक गुलाबचंद गुप्ता (वय २७) हा त्याची मैत्रीण इंद्रायणी देवेंद्र वैरागडे (वय २५, रा. जुनी मंगलवारी, लकडगंज) हिच्यासोबत रविवारी सकाळी दुचाकी (एमएच-४९ एयू-९१८८) वरून कापसी येथे मित्र विलास लांजे याला भेटण्यासाठी निघाला होता.

रस्त्यात पारडीतील विशाल सेलिब्रेशन येथे नाश्ता करून दोघे पुढे निघाले. सकाळी सुमारे १०.४० ते ११ वाजण्याच्या सुमारास भंडारा रोडवरील सुरुची कंपनीसमोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना पारडी येथील श्री भवानी रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीरज गुप्ता यांनी तपासणीअंती इंद्रायणी वैरागडे हिला मृत घोषित केले, तर विवेक गुप्ता याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर जखमी विवेक गुप्ता यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. अपघातस्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन व चालकाचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More