कॅफेबाहेर मध्यरात्री गोंधळ; महिला एपीआयला धक्काबुक्की, पोलिसांना धमकी

– मद्यधुंद दाम्पत्याला अटक, सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : नागपूरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॉर्थ अंबाझरी रोडवरील एका कॅफेबाहेर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्याने पोलिसांशीही हुज्जत घालत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक सेवकाचा अवमान करणे तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री गस्तीदरम्यान नॉर्थ अंबाझरी रोडवरील एका कॅफेबाहेर महिला व पुरुषामध्ये वाद सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षामार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना शांत राहण्याचे आवाहन करत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशीच वाद घालण्यास सुरुवात केली.

यावेळी संबंधित महिलेने महिला एपीआय यांच्या गणवेशाला धरून धक्काबुक्की केल्याचा आरोप असून, तिच्या पतीनेही पोलिसांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत स्वतःची ओळख आणि राजकीय पोहोच असल्याचा धाक दाखवत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. तपासणीदरम्यान दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक सेवकासोबत अभद्र वर्तन करणे आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More