अकरा तारखेला रमाबाई काॅलनी हत्याकांड झाले. बारा, तेरा तारीख संतप्त निदर्शने, मोर्चे आणि मुंबई बंद करण्यातच गेली आणि मला जर निटसं आठवत असेल तर, बहुदा चौदा तारखेला आम्ही सर्वांनी त्या दहा, अकरा भीम लेकरांच्या कलेवरांला राजावाडी स्मशानभूमीत सामुहिक भडाग्नी दिला. त्यावेळेस मी विलासबरोबरच होतो. विलासने त्यावेळेस एकदोन वेळेस ओम तंबाखू चघळून माझ्यासमोरच थुंकली होती. पण त्या दिवशी मला विलास नेहमीसारखा नाॅर्मल वागत नसल्याचे आतल्याआत जाणवत होतेच. तो बोलता, बोलता मधीच ट्रान्समध्ये जात होता. आम्ही काय बोलतोय हे त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. जणू काही तो एका वेगळ्याच दुनियेत वावरत होता.
आम्ही त्याला वारंवार चापट्या, थापडा मारून वर्तमानात आणायचा प्रयत्न करत होतो. पण तो तेवढ्यापुरते भानावर येऊन आम्हाला हा, हू करायचा आणि परत ट्रान्समध्ये जात होता. विलास अंतर्यामी खुपच दुखावलाय याची मला त्याचवेळेस जाणीव झाली होती. आम्हाला त्यावेळेस वाटलं की, यामागे त्याचं काहीतरी वैयक्तिक कौटुंबिक कारण असावे. पण इथेच आमची फसगत झाली. कारण आंबेडकरी चळवळीत लढताना कितीही वैयक्तिक समस्या आल्या तरी त्याचा इश्यू करायचा नसतो, हे तर आम्हाला विलासनेच शिकविले होते. त्यामुळेच विलासचे हे महत्वाचे विचारच आम्ही विसरुन गेलो. आमच्या हे लक्षात यायला हवं होतं की, विलास त्याच्या वैयक्तिक समस्येमुळे नव्हे तर या शहिद झालेल्या भीम लेकरांमुळे व्यथित झाला होता. या घटनेचा त्याला जबर धक्का बसला होता.
आणि मग सकाळीच बातमी पसरली की, विलासने आपल्या राहत्या घरातच आत्महत्या केली. नवाकाळने फासावर लटकलेल्या विलासच्या मृतदेहाचा फोटो छापला होता. घराच्या आढ्याला विलासने गळ्याला जयभीमचा निळा स्कार्फ बांधला होता. तोंडातून हातभर जीभ बाहेर आली होती. अंगावर त्याचा नेहमीचा सदरा लेंगा होता. त्याचा देह जेंव्हा खाली उतरवला तेंव्हा त्याच्या खिशात एक चिठोरे सापडले. त्यावर त्याने एकच वाक्य लिहले होते. ते वाक्य म्हणजे, “आंबेडकरी एकजूटीचा विजय असो!”. हेच वाक्य खडूने विलासने आपल्या घराच्या भिंतीवरही लिहले होते. कदाचित विलासला वाटले असावे की, आपल्या अशा फाशी जाण्याने आंबेडकरी चळवळीची एकजूट होईल आणि प्रचंड ताकदीने ती इथल्या मुर्दाड व्यवस्थेला सणसणीत उत्तर देईल.
विलासच्या मरणाला आणि रमाबाई हत्याकांडाला आज जवळपास सव्वीस वर्ष झालीत. पण ना आंबेडकरी चळवळीची एकजूट झालेय ना आपण या जुलमी व्यवस्थेला सणसणीत उत्तर देऊ शकलोय. ते एकजूटीचं आणि उत्तराचं जाऊद्या. पण आपण साधं त्या नराधम मनोहर कदमलाही शिक्षा देण्यास असमर्थ ठरलोय. मला वाटतं विलासचं मरण आपण वाया घालवलय.
विलास मुलुंडच्या डंपिंग नगरच्या वसाहतीत रहायचा. त्या वसाहतीत विलासचं घर सोडलं तर प्रत्येक घराला चार भिंती होत्या. विलासच्या घराला मात्र चवथी भिंतच नव्हती. कारण विलासचं घरच त्रिकोणी होत॔. यात फारसं असं विशेष सांगण्यासारखं काहीच नाही. कारण ज्याला त्याकाळात जिथे आणि जशी जागा मिळाली तशी त्यांनी पालं ठोकली असणार. हळूहळू त्या कच्च्या घराच्या भिंती फुरसतीनुसार आणि ऐपतीनुसार ज्याने, त्याने पक्क्या केल्या असणार. आता विलासच्या बापाच्या वाट्याला त्रिकोणी जागा आली त्याला विलास तरी काय करणार? विलास एका गुजराथी शाळेत शिपाई होता.
शाहीर गदरला ज्यावेळेस पोलीस शोधत असायचे तेंव्हा गदर विलासच्या घरात लपलेला असायचा. विलास हे जेंव्हा आम्हाला सांगायचा तेंव्हा विलास आम्हाला खुपच मोठा वाटायचा. एका शाळेत शिपाई असणाऱ्या विलासची एवढ्या मोठ्या क्रांतिकारक शाहिराशी दोस्ती असल्याचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. खंडाळ्याच्या जंगलात शाहीर कुंदन कांबळे, मास्टर राजरत्न राजगुरू, रमेश भवार, बाळ हरी झेंडे आणि मी जेंव्हा उठाव साहित्य मंचाची स्थापना करत होतो त्यावेळेस आमच्या सोबत विलासही होता.
नामांतर चळवळीत विलासने क्रांतिकारी गाणी गाऊन त्याने संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला होता. त्याने लिहलेल्या, ‘जळतोय मराठवाडा!’ या गाण्याने त्यावेळी अक्षरश: मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. नामांतर चळवळीतलं विलासचं योगदान विलक्षण आहे. आंबेडकरी चळवळ हे कधीच विसरू शकत नाही.
त्यानंतर विलासच्या बायको, पोरांचं काय झालं हे समजू शकलं नाही. कधीतरी विलास म्हणाल्याचं आठवलं की, त्याला त्या छोट्याशा घरात एक माळा करायचा होता. का तर म्हणे उद्या मुलाचं लग्न झालं तर मुलगा आणि सून माळ्यावर तरी झोपतील. पण आर्थिक ओढाताणीमुळे विलासला हे त्याचं छोटसं स्वप्नही शेवटपर्यंत पूर्ण करता आलं नाही. आठ दहा वर्षापूर्वी पुण्याच्या शनिवार वाड्यावर कविसंमेलन होतं. त्या कविसंमेलनात माझ्या, ‘दो रुपया!’ या कवितेने प्रचंड धुमाकूळ घातला. आठवलेंच्या कार्यकर्त्यानी ही कविता बंद करा म्हणून ते घोषणा देऊ लागले. पण प्रेक्षकांनी मात्र वन्स मोर देऊन मला ही कविता दोनवेळा बोलण्यास भाग पाडले.
कार्यक्रम संपल्यावर एक तरुण जोडपं स्टेजवर आलं आणि ते चक्क माझ्या पाया पडलं. मी त्यांना म्हटलं, कोण तुम्ही? तेंव्हा तो मुलगा म्हणाला, काका मी विलास घोगरेंचा मुलगा. मी इंजिनिअर असून येथेच नोकरीला आहे. ही माझी पत्नी.” विलासच्या मुलाला पाहताच मी त्याला कडकडून मिठीच मारली. त्या मिठीत मी खरं तर आमच्या विलासलाच शोधत होतो. विलासच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला मी भरभरुन आशिर्वाद दिला. त्यावेळेस खुपच समाधान वाटले. कारण आंबेडकरी कवी चळवळीत असताना आपल्या कुटुंबाची कधीच फिकीर करत बसत नाही. तो असताना त्याचे कुटुंब त्याने जणू वाऱ्यावर सोडल्यातच जमा असते. आणि मग तो नसल्यावर तर त्याच्या कुटुंबाचे काय झाले असेल याची कल्पनाही करवत नाही. आणि म्हणूनच विलासचा मुलगा इंजिनिअर आहे आणि तो पुण्यात स्थिरस्थावर झाल्याचे पाहून मनाला खुपच समाधान वाटलं.
विलास घोगरे हा मार्क्सवादी की आंबेडकरवादी या बालीश प्रश्नात मला पडायचं नाही. माझ्या दृष्टीने विलास लढणारा कवी होता. माझ्यासाठी त्याचं लढणं महत्वाचं आहे. आपल्या घरात बसून मोठमोठ्या तार्किक गप्पा झोडणारे आंबेडकरी असोत वा मार्क्सवादी असोत. अशा बाजारबुणग्यांना मी शुन्य किंमत देतो. कारण हे पुस्तकी पंडित स्टेजवर मोठमोठ्या गप्पा हाणतात आणि जेंव्हा हातघाईची लढाई असते तेंव्हा घरात दडून बसतात. असले बोलके पोपट आंबेडकरवादी असले काय किंवा मार्क्सवादी असले काय, चळवळीला काडीमात्र फरक पडत नाही. पण जो,जो माणूस अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढतो तो,तो माझा माणूस आहे मग तो कोणीही असो, असे मी समजतो. आणि म्हणूनच विलास घोगरे हा माझा माणूस होता, आहे आणि पुढेही राहील.
विलास कविता लिहायचा, शाहीरी गाणी लिहायचा. कधीकधी तो मुक्तछंदातही समर्थपणे व्यक्त व्हायचा. कष्टकरी, शेतकरी, मजूर, दलित, शोषित हे त्याचे नायक होते. “बुध्द, भिम हे मानव होते, देव तयांना म्हणू नको”., हे त्याचं गाणं मला खुपच आवडायचं. स्वातंत्र्यावरचा एक उघडा नागडा आशय असणारा त्याचा एक मुक्तछंद तर जबरदस्तच होता. बुध्द म्हणतात दुःखाची सुरुवात ‘मी’ पासून होते. मी, माझे कुटुंब, माझे गाव, माझी जात, माझा धर्म, माझा देश अशी ही यादी आपल्याला हवी तितकी वाढवता येते. माझे कुटुंब, माझे गाव, माझी जात, माझा धर्म, माझा देश हे सगळेच महान होतात कारण या सर्वाच्या पाठी ‘मी’ असतो. आणि हा ‘मी’ पणाच माणसाला एक दिवस खड्ड्यात घालतो. विशेषतः आंबेडकरी चळवळीतील माणसाने हा ‘मी’ पणा सोडून ‘आम्ही’ पणा स्विकारला पाहिजे, हे भलंमोठं तत्वज्ञान मला विलास नावाच्या या रस्त्यावरच्या शाहिराने एका चुटकीसरशी शिकवलं. कसं ते सांगतो…
विलासने हिंदी, मराठी अशा धेडगुजरी भाषेत एक विनोदी गाणं लिहलं होतं. हे गाणं जरी विनोदी असलं तरी त्यातला सामाजिक आशय फारच मोठा होता. एक विस्थापित गरीब दांपत्य आपला गाव सोडून मुंबईच्या झोपडपट्टीत रहायला येतं. त्या माणसाची गावात वाढलेली त्याची पत्नी जेंव्हा त्या मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीवन अनुभवते आणि तो अनुभव ती आपल्या मैतरणीला आपल्या हिंदी मिश्रित मराठी भाषेत ऐकवते, अशा प्रकारचं ते गाणं होतं. मग त्यात सार्वजनिक नळावरची भांडणं, रेल्वे रुळावरचं शौचविधी उरकणं वगैरे, वगैरे प्रकार विलासने अत्यंत खुबीने त्या गाण्यात चितारले होते. हे गाणं जेंव्हा विलास कविसंमेलनात गाऊन म्हणायचा तेंव्हा लोकं पोट धरून, धरुन हसायचे. असं हे गाणं एका मोठ्या गायकाने विलास कडून मागून घेतलं. ते गाणं त्याने नंतर स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलं. अर्थात हे गाणं त्यावेळेस खुपच लोकप्रिय झालं. पण त्या गायकाने याबाबत विलासला एक पैशाचीही राॅयल्टी दिली नाही आणि कवी म्हणून त्याचा साधा उल्लेखही केला नाही.
खरं तर विलासची परिस्थिती ही फारशी चांगली नव्हतीच. त्यामुळे विलासला जर त्या गाण्याची राॅयल्टी मिळाली असती तर तेवढाच त्याला हातभार लागला असता. पण त्या गाण्याच्या राॅयल्टीबाबत एकदा मी विलासला विचारले. तेंव्हा विलास मला म्हणाला, आपलं गाणं असं कोण विकतं का? मग मी म्हणालो, मग निदान कवी म्हणून तुमचं नाव तरी द्यायला हवं होतं. त्यावेळेस विलासने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, अरे गाणं जरी आपण लिहलं तरी ते सरस्वती, बिरस्वतीकडून येत नाही. हे गाणं, या कविता येतात त्या आपल्या सभोवतालच्या लोकांकडून. म्हणजेच या कविता वा गाण्याचे खरे मालक हे लोकच असतात. कारण आपण हे गाणं, या कविता ह्या लोकांमध्येच राहून लिहतो. हीच लोकं आपल्याला विषय देतात, प्रेरणा देतात. आपण मात्र त्याला फक्त शब्दबद्ध करतो. म्हणूनच या कवितांचे, या गाण्यांचे मालक आपण नसून खरे मालक लोकच असतात. लोकांकडून घेतलेलंच आपण लोकांना परत देतो. मग जे लोकांचच आहे
त्याबद्दल राॅयल्टी मागणं, आपल्या नावाचा आग्रह करणं, हे चुकीचच नाही का? या कविता, ही गाणी माझ्या एकट्याची नसून आपल्या सगळ्यांची आहेत हे विलास जेंव्हा सांगत होता तेंव्हा तो खरोखरच ‘मी’ पासून ‘आम्ही’ कडे प्रवास करताना मी अनुभवत होतो. यालाच तर ‘लोककवी’ म्हणतात. विलास घोगरे हा खऱ्या अर्थाने अस्सल लोककवी होता. पंधरा जुलै म्हणजे विलासचा मरण दिवस. पण लोककवी कधी मरत नसतो. तो लोकांमधून आपल्या कवितेतून, आपल्या गाण्यातून आणखी प्रखरतेने जीवंत होऊन आपल्याबरोबर जगत असतो. आज पंचवीस वर्षानंतरही विलास आपल्याला त्याच्या कवितेतून, गाण्यातून भेटतोच आहे. विलास आपल्या सोबतच आहे. आणि जो कधी मेलाच नाही त्याला श्रध्दांजली, आदरांजली वाहण्यात काहीच अर्थ नसतो. इतकेच म्हणतो लोककवी विलास घोगरे अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार आहे. जयभीम!
– विवेक मोरे, मुंबई
Author: संतोष तायडे
संपादक











