– पुरुष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चेक पॉइंटवर ड्युटी
The Exposer
नागपूर : नागपूरच्या रस्त्यांवर आता महिला पोलिसांची ‘फ्रंटलाइन’वरील उपस्थिती ठळकपणे जाणवू लागली आहे. पावसाची तमा न बाळगता गर्दीचे चौक, चेक पॉइंट, बंदोबस्ताची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात महिला पोलीस पुरुष कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावताना दिसत आहेत. पोलीस दलातील बदलत्या कार्यसंस्कृतीचे हे चित्र निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, महिला पोलीस रस्त्यावर प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना दिसत असताना वाहतूक पोलिसांची प्रभावी आणि सातत्यपूर्ण उपस्थिती कुठे आहे? असा प्रश्न आता नागपूरकरांमध्ये चर्चिला जात आहे.
वाहतूक पोलिसांची प्राथमिक जबाबदारी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे यासाठी चौकाचौकात प्रभावी उपस्थिती राखणे ही आहे. मात्र, काही ठिकाणी वाहतूक नियंत्रणापेक्षा चालान कारवाईवर अधिक भर दिला जात असल्याची नागरिकांची भावना आहे.
त्यामुळे ‘दृश्यमान पोलीसिंग’ केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस दलाच्या कामकाजात शिस्त, वर्दी आणि दृश्यमान पोलीसिंगला प्राधान्य दिले आहे. कर्तव्यावर असलेला प्रत्येक पोलीस कर्मचारी वर्दीत दिसला पाहिजे, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. ‘वर्दी ही केवळ पोशाख नसून कायद्याचा अधिकार आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे,’ या भूमिकेतून पोलीस दलात शिस्तीवर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने ड्युटीवर जाताना वर्दी परिधान करण्याबाबतही काटेकोरपणा आणण्यात आला आहे.
यासह शहरातील प्रमुख चौक, चेक पॉइंट, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात महिला पोलिसांची उपस्थिती वाढताना दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यापासून नागरिकांना मदत करणे, बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणे आणि परिस्थितीनुसार प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या महिला पोलीस समर्थपणे पार पाडत आहेत.
‘ड्युटी म्हणजे ड्युटी’ हा संदेश महिला पोलिसांनी आपल्या प्रत्यक्ष कामातून दिला आहे. त्यांचा हा सहभाग केवळ पोलीस दलासाठी अभिमानाची बाब नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. रस्त्यावर गणवेशातील महिला पोलीस दिसल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांमध्ये मदतीचा आणि सुरक्षेचा विश्वास निर्माण होतो. दुसरीकडे, शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची 12 तास अपेक्षित आणि सातत्यपूर्ण दृश्यमानता नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
नागरिकांच्या मते, शहरात दृश्यमान पोलीसिंग वाढविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या निर्णयाची खरी परीक्षा चौकाचौकातील वाहतूक नियंत्रणात होणार आहे. महिला पोलीस प्रतिकूल परिस्थितीतही मैदानात उतरून आपली जबाबदारी धडाडीने पार पाडताना दिसत असतील, तर वाहतूक विभागानेही त्याच तत्परतेने आणि कार्यक्षमतेने मैदानात उतरून आपली उपस्थिती सिद्ध करणे अपेक्षित असल्याचे म्हटले जातं आहे.
Author: संतोष तायडे
संपादक










