महिना उलटला, शताब्दी चौकातील बाबासाहेबांचा म्युरल आर्ट पुतळा अजूनही कागदावरच!

– आमदार अभिजित वंजारी यांच्या आश्वासनाचे काय झाले? दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपूरच्या नागरिकांचा सवाल; निधी व पाठपुराव्याची मागणी

The Exposer
नागपूर : ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य आणि कायमस्वरूपी म्युरल आर्ट पुतळा उभारण्याच्या मागणीला लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी प्रत्यक्षात या प्रस्तावाची पुढील कार्यवाही कुठपर्यंत पोहोचली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “आमदार साहेब, आश्वासन दिले; आता बाबासाहेबांच्या म्युरल आर्टचे काय झाले?” असा थेट सवाल दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शताब्दी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्युरल पुतळ्यासाठी आ. अभिजित वंजारी यांना 27 जून 2026 रोजी निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात, पत्रकार संतोष तायडे, सामाजिक कार्यकर्ते सोनू मंडपे, दिलीप बेलिया.

छत्रपती चौक ते मानेवाडा चौक मार्गावरील या चौकाला नागपूर महानगरपालिकेने ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ असे अधिकृत नाव दिले आहे. मात्र, या नावाला साजेशे कायमस्वरूपी स्मारक अथवा भव्य पुतळा अद्याप उभारण्यात आलेला नाही. सध्या लोखंडी अँगलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक चौकाचे सर्वांगीण सुशोभीकरण करून भव्य म्युरल आर्ट पुतळा, आकर्षक प्रकाशयोजना, हरितीकरण आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

27 जूनला निवेदन; महिन्यानंतरही पुढे काय?

सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाने 27 जून 2026 रोजी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची भेट घेऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह सविस्तर निवेदन दिले होते. लोकप्रतिनिधी म्हणून या मागणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर आवश्यक पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

निवेदनाची दखल घेत आमदार वंजारी यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्वतः पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती.

मात्र, 27 जूनच्या निवेदनाला महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकल्पाबाबत नेमकी कोणती कार्यवाही झाली, प्रस्ताव कुठे आहे, निधीची प्रक्रिया सुरू झाली का आणि मनपा अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला का, याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना अद्याप मिळालेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

संविधानाच्या नावाने जनजागृती; मग बाबासाहेबांच्या स्मारकासाठी विलंब का?

एकीकडे काँग्रेसकडून संविधान आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या मूल्यांबाबत देशभर जनजागृती केली जात असल्याचा काँग्रेसकडून दावा केला जातो. अशा पार्श्वभूमीवर नागपूरसारख्या शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अधिकृत असलेल्या चौकात त्यांच्या विचारांना आणि कार्याला साजेसे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आश्वासनापुरता मर्यादित राहू नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानाचा जयघोष देशभर होत असताना, नागपूरच्या या महत्त्वाच्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पावले कधी उचलली जाणार, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

“फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती दाखवा!”

शताब्दी चौक हा फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी, सामाजिक न्याय आणि संविधानवादी चळवळींच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. संविधान दिन, जयंती, सामाजिक उपक्रम तसेच विविध जनआंदोलनांसाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यामुळे या चौकाला भव्य आणि आधुनिक स्वरूप देणे ही केवळ सुशोभीकरणाची बाब नसून, नागपूरच्या सामाजिक आणि वैचारिक ओळखीशी संबंधित बाब असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आमदार वंजारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निधीची तरतूद करून प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे का? संबंधित विभागांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे का? त्याची सद्यस्थिती काय आहे? या सर्व प्रश्नांची स्पष्ट माहिती आमदारांनी नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा चौक आहे; मग त्यांच्या भव्य म्युरल आर्टसाठी आणखी किती प्रतीक्षा?” असा सवाल आता दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूरमधील नागरिक उपस्थित करीत आहेत. या चौकाच्या आकर्षक विकासासह सुशोभीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात, पत्रकार संतोष तायडे, सोनू मंडपे, दिलीप बेलीयां यांच्यासह अनेक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More