धंतोलीतील पाच जण बेपत्ता प्रकरण : रामेश्वरीतील वैद्य दाम्पत्य हत्याकांडाची पुनरावृत्ती तर नाही ना?

– ‘मिसिंग’ म्हणून फाईल बंद नको; प्रत्येक धाग्याची कसून चौकशी करा!

The Exposer
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले आहे. कर्जबाजारीपणा, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणते कारण या बेपत्ता होण्यामागे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अशा प्रकरणांमध्ये केवळ ‘मिसिंग’ म्हणून नोंद करून तपास मर्यादित ठेवणे धोकादायक ठरू शकते, याची आठवण रामेश्वरीतील वैद्य दाम्पत्य हत्याकांड करून देते.

काही वर्षांपूर्वी रामेश्वरीतील काशीनगर येथे राहणारे अतुल पंढरीनाथ वैद्य आणि त्यांची पत्नी वंदना वैद्य अचानक बेपत्ता झाले होते. सुरुवातीला ते घर सोडून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तपास पुढे सरकताच हे साधे बेपत्ता प्रकरण नसून नियोजनबद्ध हत्याकांड असल्याचे उघड झाले.

तीन हजार चौरस फुटांच्या जागेवर ताबा मिळविण्याच्या वादातून वैद्य दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या घरातच हत्या करण्यात आल्याचा तपासात निष्कर्ष समोर आला. त्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृत दाम्पत्याचे मोबाईल फोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू-बंद करून खोटे लोकेशन निर्माण केले. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि तपास बराच काळ ‘मिसिंग’च्या दिशेने फिरत राहिला.

या प्रकरणात क्राईम रिपोर्टर संतोष तायडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास अधिकारी नियुक्त केला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही तपासातील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली होती. अखेर पोलिसांनी तपासाचा फास आवळल्यानंतर बुटीबोरीजवळील जंगलातून वैद्य दाम्पत्याचे एकाच खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढून संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला होता.

याचप्रमाणे वंजारीनगर येथील ‘लक्ष्मीप्रयाग अपार्टमेंट’मध्ये राहणारे ऍड. भैयासाहेब धवड (६२) आणि त्यांची पत्नी वनिता धवड (५३) हे जुलै २०१८ पासून रहस्यमयरीत्या बेपत्ता आहेत. या प्रकरणातही सुरुवातीला विविध शक्यता व्यक्त करण्यात आल्या; परंतु अनेक वर्षे उलटूनही त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. यासंदर्भात जिल्हा बार असोशिएशनने तत्कालीन पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली होती. मात्र नंतर गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतरही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही.

अशा पार्श्वभूमीवर धंतोलीतील पाच जणांच्या बेपत्ता प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वंकष दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्तेचे वाद, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, प्रवासाचा मागोवा तसेच संबंधित व्यक्तींचे सामाजिक व व्यावसायिक संबंध अशा प्रत्येक अंगाने तपास होणे आवश्यक आहे.

वैद्य दाम्पत्य प्रकरणात सुरुवातीला ‘मिसिंग’ वाटणाऱ्या घटनेमागे भीषण हत्याकांड दडलेले होते. त्यामुळे धंतोलीतील प्रकरणातही कोणतीही शक्यता गृहित धरून चालण्याऐवजी प्रत्येक धाग्याची शास्त्रशुद्ध आणि सखोल चौकशी करणे ही काळाची गरज आहे. प्रश्न केवळ पाच जण बेपत्ता असल्याचा नाही, तर सत्य किती खोल दडले आहे, याचा आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More