– CEIR पोर्टलच्या मदतीने शोध; 300 नागरिकांच्या उपस्थितीत मोबाईल सुपूर्द, नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा भाव
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या परिमंडळ क्र. 5 अंतर्गत हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तब्बल 41 लाख 98 हजार 54 रुपये किंमतीचे 221 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात परत दिले. पारडी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात नागरिकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमामुळे नागरिकांनी पोलिसांबद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केले. परिमंडळ क्र. 5 अंतर्गत कळमना, यशोधरानगर, पारडी आणि वाठोडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नोंद झालेल्या हरवलेल्या मोबाईलचा CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. त्यानुसार कळमना – 77, यशोधरानगर – 31, पारडी – 40 आणि वाठोडा – 73, असे एकूण 221 मोबाईल हस्तगत करण्यात आले.

या मोबाईलची एकूण किंमत ₹41,98,054 इतकी असून, ती संबंधित मालकांना परत करण्यात आली. या कार्यक्रमाला सुमारे 300 नागरिक उपस्थित होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) वसंत परदेशी यांच्या देखरेखीखाली, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त रोहित ओहाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे (कळमना), युनूस शेख (यशोधरानगर), नंदा मनगटे (पारडी), प्रमोद पोरे (वाठोडा), नितीन चरडे (भांडेवाडी) तसेच मोबाइल मिसिंग पथकातील पोलीस अंमलदार कुणाल, धनराज, रामचंद्र, महेंद्र, आशीष पिपरेडे आणि प्रवीण यांनी विशेष परिश्रम घेतले.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
हरवलेला किंवा चोरीस गेलेला मोबाईल तात्काळ CEIR पोर्टलवर नोंदणी करून ब्लॉक करावा तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्यामुळे मोबाईलचा शोध घेणे आणि तो मूळ मालकाला परत मिळवून देणे अधिक सुलभ होते, असे आवाहन नागपूर शहर पोलिसांनी केले आहे. तसेच कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती त्वरित डायल 112 वर देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











