The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सोमवार (६ जुलै २०२६) रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्यपदी डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची विद्यापीठ कायदा व विद्यापीठ अध्यादेश क्रमांक २४ मधील तरतुदीनुसार पुनर्स्थापना करण्यात आली. समितीच्या या निर्णयामुळे मागील काही काळापासून सुरू असलेल्या प्रकरणावर पडदा पडला आहे.
समितीच्या बैठकीस अध्यक्ष विलास गजघाटे यांच्यासह डॉ. राजेंद्र गवई, डॉ. कमलताई गवई, एन. आर. सुटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. डी. जी. दाभाडे आणि भदंत नागदीपंकर उपस्थित होते.
डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांची विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत १ जानेवारी २०२२ रोजी नियमित प्राचार्यपदी निवड झाली होती. त्यानुसार त्यांनी १३ एप्रिल २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला होता.
मात्र, त्यानंतर स्मारक समितीच्या तत्कालीन अध्यक्षांनी समितीचा कोणताही ठराव न घेता आणि कोणतीही चौकशी न करता त्यांना पदावनत केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची पुनर्स्थापना करण्यात आली.
विशेष म्हणजे, नागपूर विद्यापीठाने डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांना एप्रिल २०२७ पर्यंत प्राचार्य म्हणून मान्यता दिलेली आहे. समितीच्या ताज्या निर्णयामुळे त्यांच्या नियमित नियुक्तीला पुन्हा वैधता प्राप्त झाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











