– देशातील पहिल्या संविधान चौकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
The Exposer
नागपूर : देशातील पहिला संविधान चौक असलेल्या नागपूरातील संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करून संविधान चौक ते झिरो माईल हा संपूर्ण परिसर “राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ” म्हणून घोषित करावा, अशी ठाम मागणी संविधान चौक–डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारीकरण समितीने केली आहे. या मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्फत सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
यासंदर्भात समितीचे मुख्य संयोजक संतोष तायडे यांनी टिळक पत्रकार भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना समितीचे मुख्य संयोजक संतोष तायडे, संयोजक ऍड. देवेंद्र यादव, प्रकाश कुंभे, दिनेश शर्मा, जनार्दन मून, सुरेश मून, क्षितिज गायकवाड.
समितीच्या म्हणण्यानुसार, नागपूरातील संविधान चौक हा देशातील पहिला संविधान चौक असून भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याशी नागपूरचे असलेले अतूट नाते लक्षात घेता या परिसराला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख आणि दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले.
संविधान चौकात एकवटले कार्यकर्ते सोनू मंडपे, गणेश मथुरे, ऍड. देवेंद्र यादव, दिनेश शर्मा, संतोष तायडे, जनार्दन मून, सुरेश मून, सुरेंद्रपाल सिंग.
गेल्या काही वर्षांत संविधान चौक हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि लोकशाही आंदोलनांचे प्रमुख केंद्र बनला आहे. मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि रुग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत असल्याने या परिसराचे नियोजनबद्ध विस्तारीकरण, आधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे समितीने स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गणेश मथुरे, रजत महेशगवळी, सुरेंद्रपाल सिंग, क्षितिज गायकवाड, दिनेश शर्मा, जनार्दन मून, सुरेश मून, रमेश जिवणे, ऍड. देवेंद्र यादव, ऍड. ओमप्रकाश यादव, प्रकाश कुंभे, संतोष तायडे, सोनू मंडपे.
समितीच्या प्रमुख मागण्या
– संविधान चौक ते झिरो माईल चौकादरम्यान आवश्यक जागा संपादित करून संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करण्यात यावे.
– संविधान चौक ते झिरो माईल परिसराचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून जागतिक दर्जाचे सुशोभीकरण करण्यात यावे.
– नागरिकांसाठी प्रशस्त पदपथ, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ व्यवस्था आणि पुरेशी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून द्यावी.
– आंदोलने, धरणे, मोर्चे व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र आणि नियोजित जागा विकसित करण्यात यावी.
– संविधान चौकाला “राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ” घोषित करून विशेष विकास आराखडा मंजूर करावा व आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.
समितीने सांगितले की, या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामार्फत सादर करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे मुख्य संयोजक संतोष तायडे असून, संयोजक म्हणून ॲड. देवेंद्र यादव, प्रकाश कुंभे, सुरेश मून, सुरेंद्रपाल सिंग, दिनेश शर्मा, जनार्दन मून, क्षितिज गायकवाड, संजय सहारे, रजत महेशगवळी, वृषभ राऊत, सोनू मंडपे, गणेश मथुरे यांच्यासह इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक











