– 10.432 किलो गांजा जप्त, 3 तस्कर जेरबंद, ₹33,41,950 चा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात कळमना पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत ओडिशातून नागपुरात विक्रीसाठी आणण्यात आलेला 10.432 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत 3 तस्करांना अटक करण्यात आली असून, गांजासह टाटा ट्रक, होंडा ॲक्टिव्हा, 3 मोबाईल असा एकूण ₹33,41,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कळमना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा नागपुरात विक्रीसाठी आणला जाणार आहे. या माहितीच्या आधारे तपास पथकाने रात्री गस्तीदरम्यान सापळा रचून संशयितांवर पाळत ठेवली.
दरम्यान, एच. बी. टाऊन ते चिखली चौक मार्गावरील कालीमाता मंदिर परिसरात प्लास्टिकचे पांढरे पोते घेऊन जाणाऱ्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने पोत्यामध्ये गांजा असल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास करत होंडा ॲक्टिव्हा आणि 16 चाकी टाटा ट्रक ताब्यात घेतला.
वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये 10.432 किलो गांजा आढळून आला.
याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून रिंकू सुरेश राजपूत (30, नागपूर), गुरुप्रीत सिंह सुरजीत मुलतानी (43, यशोधरानगर, नागपूर) आणि बाल्या सुभाष भडके (40, नागपूर) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 10.432 किलो गांजा, 3 मोबाईल, होंडा ॲक्टिव्हा आणि 16 चाकी टाटा ट्रक असा एकूण ₹33,41,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामागिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ५ नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळमना विभाग रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) करिम खाँ पठाण, पोलीस उपनिरीक्षक तथा तपास पथक प्रमुख संतोषकुमार रामलोड, पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार अनिल जाधव, पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहोकार यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











