‘पिंपळाच्या पानातून लोकशाहीचा आरसा’ : आध्यात्मिक गुरूंच्या रेखांकनातून संविधान रक्षणाचा बुलंद संदेश

– संविधान चौकात चित्रकार सुरेश मून यांची अनोखी समाजजागृती; कला, विज्ञानवादी अध्यात्म आणि सामाजिक जाणिवेचा अनोखा संगम

The Exposer
नागपूर : देशातील पहिल्या संविधान चौकात, नागपूर येथे पिंपळाच्या पानावर आध्यात्मिक गुरूंचे रेखांकन करून प्रसिद्ध चित्रकार सुरेश मून यांनी आपल्या अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून लोकशाही, संविधान आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश समाजापुढे ठेवला आहे. त्यांच्या या अभिनव कलाप्रयोगातून कला, विज्ञानवादी अध्यात्म आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

चित्रकार सुरेश मून हे केंद्रीय विद्यालय, अजनी, नागपूर येथून कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी तब्बल ३३ वर्षे विद्यार्थ्यांमध्ये कलासंस्कार रुजविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. सध्या ते लॉर्ड फाउंडेशन ऑफ फाईन आर्ट, नागपूरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (Chief Managing Director) म्हणून कार्यरत आहेत.

भारतातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या कलेतून भाष्य करताना सुरेश मून यांनी अत्यंत विचारप्रवर्तक संदेश दिला आहे. त्यांच्या मते, देशातील राजकीय घडामोडींमुळे समाजात धार्मिक आणि सामाजिक स्तरावर दुरावा वाढत असून, त्याचा परिणाम संविधानाने अधोरेखित केलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवर होताना दिसत आहे.

त्यांच्या चित्रामध्ये भारतीय लोकशाहीचे एका भारतीय स्त्रीच्या रूपात प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले आहे. हे रूप जणू स्वतःचे अस्तित्व आणि अस्मिता जपण्यासाठी अखेरची धडपड करणाऱ्या भारतमातेची व्यथा व्यक्त करते. या अवस्थेला जबाबदार कोण, असा अस्वस्थ करणारा प्रश्नही ही कलाकृती समाजासमोर उभी करते.

पालथे पडलेले संविधान आणि त्यावरून सुरू होणारे पथसंचलन, हे चित्रातील अत्यंत तीव्र आणि विचारप्रवर्तक प्रतीक म्हणून समोर येते. या प्रतीकात्मक मांडणीतून महिलांवरील अन्याय, लोकशाहीसमोरील आव्हाने आणि संविधानिक मूल्यांवर निर्माण झालेल्या धोक्याचे कलात्मक दर्शन घडविण्यात आले आहे. समाजातील वाढती असहिष्णुता, मतभेद आणि तणाव यांचा राष्ट्राच्या एकात्मतेवर होणारा परिणामही या चित्रातून ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.

सुरेश मून यांच्या मते, भारतीय लोकशाहीचे भविष्य आता जनतेच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार सजगपणे बजावणे, संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवणे ही काळाची गरज आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असून, जागरूक नागरिकत्व हाच देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे, असा बुलंद संदेश त्यांनी आपल्या कलाकृतीतून दिला आहे.

कलेच्या माध्यमातून समाजाला अंतर्मुख होण्यास आणि विचार करण्यास भाग पाडणारा सुरेश मून यांचा हा अभिनव उपक्रम नागपूरच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेत मोलाची भर घालणारा ठरत आहे. संविधान चौकातील पिंपळाच्या पानावर साकारलेली ही कलाकृती केवळ चित्र नसून, ती लोकशाहीच्या वर्तमानावर भाष्य करणारा आणि संविधान रक्षणासाठी नागरिकांना जागृत करणारा एक प्रभावी कलात्मक दस्तऐवज ठरत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More