अंथरुणाला खिळलेल्या पोलिसाचा अंगठा घेऊन प्लॉट हडपण्याचे ‘षडयंत्र’?

– एनएमआरडीएचे काम करून देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन; मूळ दस्तऐवज ताब्यात घेऊन कथित विक्री करारनामा तयार केल्याचा गंभीर आरोप

– ब्रेनस्ट्रोकग्रस्त पोलिसाच्या असहाय अवस्थेचा गैरफायदा घेतल्याची बहिणीची तक्रार; सदर पोलिसांकडून चौकशी सुरू

The Exposer
नागपूर : ब्रेनस्ट्रोक आणि अर्धांगवायूमुळे अनेक वर्षांपासून पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या नागपूर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या असहाय व वैद्यकीयदृष्ट्या गंभीर अवस्थेचा गैरफायदा घेत त्यांचा भूखंड बळकावण्यासाठी कथितरीत्या सुनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून प्रथम कुटुंबाचा विश्वास संपादन करणे, भूखंडाचे प्रशासकीय काम करून देण्याच्या नावाखाली मूळ कागदपत्रे ताब्यात घेणे, कोणताही मजकूर वाचू अथवा समजावून न देता स्वाक्षऱ्या घेणे, व्यवहार समजून घेण्यास कथितरीत्या असमर्थ असलेल्या आजारी पोलीस कर्मचाऱ्याचा अंगठ्याचा ठसा घेणे आणि त्यानंतर भूखंडाचा कथित विक्री करारनामा तयार करणे, असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

याप्रकरणी कु. वनिता लक्ष्मण नगरकर यांनी सदर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असली, तरी संपूर्ण घटनाक्रमामुळे फसवणूक, विश्वासघात, मूळ दस्तऐवजांचा कथित अपहार आणि दिशाभूल करून स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा घेतल्याच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

अजय नगरकर

1991 मध्ये पोलीस दलात सेवा; 2019 पासून अंथरुणावर

तक्रारीनुसार, वनिता नगरकर यांचे लहान भाऊ अजय लक्ष्मण नगरकर हे 1991 मध्ये नागपूर शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले होते. 2013 मध्ये त्यांना प्रथम अर्धांगवायूचा झटका आला. उपचारानंतर प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याने ते पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र, 2019 मध्ये त्यांना पुन्हा गंभीर ब्रेनस्ट्रोक आणि अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हापासून ते पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अजय नगरकर यांना स्वतःहून उठून बसणे, चालणे, बोलणे, लिहिणे अथवा वाचणे शक्य नसून कोणत्याही आर्थिक किंवा मालमत्ताविषयक व्यवहाराचे स्वरूप समजून घेऊन स्वतंत्र निर्णय देण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत गंभीर प्रश्न असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

त्यामुळे कथित विक्री कराराच्या वेळी त्यांची वैद्यकीय आणि निर्णयक्षमता नेमकी काय होती, त्यांना व्यवहाराचा संपूर्ण मजकूर समजावून सांगण्यात आला होता का आणि त्यांचा अंगठ्याचा ठसा स्वतंत्र व स्वेच्छेने घेण्यात आला की अन्य पद्धतीने, याची वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एनएमआरडीएचे काम करून देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन?

तक्रारीनुसार, अजय नगरकर यांनी 5 फेब्रुवारी 2009 रोजी मौजा बनवाडी येथील एक हजार चौरस फूट भूखंड नोटरी कब्जापत्राद्वारे खरेदी केला होता. 2024 मध्ये अनिल नारायण पवार याच्याशी वनिता नगरकर यांची ओळख झाली. संबंधित व्यक्तीने विविध शासकीय कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगितले. भूखंडासंदर्भातील एनएमआरडीएची डिमांड आणि आरएल काढून देण्याचे आश्वासन देत नगरकर कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कामासाठी आवश्यक कागदपत्रे असल्याचे सांगून संबंधित व्यक्ती घरी आली. त्यावेळी कोणत्याही दस्तऐवजाचा मजकूर वाचून अथवा समजावून न सांगता वनिता नगरकर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. तसेच वैद्यकीयदृष्ट्या गंभीर अवस्थेत असलेल्या अजय नगरकर यांचा अंगठ्याचा ठसाही घेण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या मते, भूखंडाच्या प्रशासकीय कामासाठी स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रे आवश्यक असल्याचा विश्वास निर्माण करण्यात आला होता. मात्र, त्याच स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याच्या ठशाचा वापर कथित विक्री व्यवहारासाठी करण्यात आला असेल, तर हा केवळ करारातील मतभेद अथवा मालमत्तेचा दिवाणी वाद राहत नाही. सुरुवातीपासून वेगळा उद्देश लपवून विश्वास संपादन करण्यात आला का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

मूळ कागदपत्रे घेतली; घरात आढळला 50 हजारांचा धनादेश

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने भूखंडाची सर्व मूळ कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर घरात 50 हजार रुपयांचा धनादेश आढळून आला. या धनादेशाबाबत वारंवार विचारणा करूनही समाधानकारक अथवा स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. जवळपास दीड वर्ष भूखंडाची मूळ कागदपत्रे परत देण्यास कथितरीत्या टाळाटाळ करण्यात आली. अखेर मूळ दस्तऐवजांऐवजी केवळ झेरॉक्स प्रती देण्यात आल्या. त्या प्रती तपासल्यानंतर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भूखंडाचा कथित विक्री करारनामा तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

एक हजार चौरस फुटांचा भूखंड अवघ्या 70 हजारांत विकल्याचे दाखविले?

कथित करारनाम्यात भूखंडाचा मोबदला 70 हजार रुपये दाखविण्यात आला असून, त्यापैकी 20 हजार रुपये रोख दिल्याचा उल्लेख असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यावर वनिता नगरकर यांची स्वाक्षरी आणि अजय नगरकर यांचा अंगठ्याचा ठसा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, भूखंड विकण्याचा कोणताही निर्णय घेतला नव्हता, विक्री व्यवहाराबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि भूखंडाच्या प्रशासकीय कामासाठी कागदपत्रे दिली होती, असा तक्रारदाराचा दावा आहे.

त्यामुळे कथित करारनामा कोणत्या परिस्थितीत तयार करण्यात आला, स्टॅम्प पेपर कोणी खरेदी केला, त्यावरील मजकूर कोणी तयार केला, कथित व्यवहाराच्या वेळी कोण उपस्थित होते, मोबदल्याची रक्कम प्रत्यक्षात देण्यात आली का आणि संबंधित रकमेचा आर्थिक पुरावा उपलब्ध आहे का, या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More