– पाणावलेले डोळे, घट्ट मिठी अन् भावनांचा बांध फुटला; नागपूर मध्यवर्ती कारागृहात १६६ बंदी आणि त्यांच्या पाल्यांची अविस्मरणीय भेट
The Exposer
नागपूर : “क्षणभर ना मला तुझा विसर पडला, व्याकुळला जीव माझा बाळा तुझ्या रे भेटीला…” या भावस्पर्शी ओळींची प्रत्यक्ष अनुभूती शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘गळाभेट’ कार्यक्रमात आली. कारागृहाच्या उंच भिंतींमुळे अनेक दिवस आपल्या आई-वडिलांपासून दूर असलेल्या मुलांनी त्यांना प्रत्यक्ष भेटताच घट्ट मिठी मारली. कुणी वडिलांच्या खांद्यावर खेळले, कुणी आईच्या कुशीत विसावले, तर भेटीची वेळ संपल्यानंतर अनेकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या पालकांना निरोप दिला. या भावनिक क्षणांनी कारागृहातील वातावरणही काही काळ भारावून गेले.

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात सिद्धदोष बंदी तसेच सिद्धदोष व न्यायाधीन महिला बंदींच्या १८ वर्षांखालील मुलांसाठी, भाऊ-बहीण आणि नातवंडांसाठी ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक तथा पूर्व विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव सु. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश-९ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. आयचित उपस्थित होते. त्यांनी बंदींना मार्गदर्शन करताना सांगितले की, माणसाच्या हातून अनेकदा नकळत गुन्हा घडतो. मात्र, त्यातून बाहेर पडून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडविणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मीकी झाला, त्याचप्रमाणे प्रत्येकाने स्वतःच्या विचारांत आणि वर्तनात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. न्यायालय शिक्षा देते; मात्र कारागृह प्रशासन बंदींचे पालनपोषण करून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे कारागृहातील वर्तन नेहमी चांगले ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान एका बंदीच्या मुलाने आईवर स्वतः लिहिलेली भावस्पर्शी कविता सादर केली, तर सहा वर्षांच्या चिमुकलीने गीत गायन केले. प्रमुख अतिथींनी दोन्ही बालकांच्या कलागुणांचे कौतुक केले.

१६६ बंदींच्या २८३ पाल्यांनी घेतली प्रत्यक्ष भेट
‘गळाभेट’ कार्यक्रमात १६६ बंदींच्या एकूण २८३ पाल्यांनी कारागृहात आपल्या आई-वडिलांची, भावंडांची आणि आजी-आजोबांची प्रत्यक्ष भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाला सुमारे ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला. सुरुवातीला काही मुले लाजत, संकोचत आणि काहीशी घाबरत आपल्या पालकांच्या भेटीसाठी आली. मात्र, काही वेळातच त्यांचा संकोच दूर झाला. अनेक मुले आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या अंगाखांद्यावर मनसोक्त खेळली. पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि घरातील परिस्थितीची आपुलकीने विचारपूस केली. कारागृह अधीक्षक वैभव सु. आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा वै. आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे आणि वरिष्ठ तुरुंगाधिकारी मनोहर भोसले यांनी पाल्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाची माहिती घेतली. तसेच कारागृहातील प्रत्यक्ष भेटीबाबत त्यांचे अनुभव आणि मनोगत जाणून घेतले.
निरोपाच्या क्षणी पाणावले डोळे
भेटीची वेळ संपल्यानंतर अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना, भावंडांना आणि आजी-आजोबांना अश्रुपूर्ण डोळ्यांनी निरोप दिला. मुलांच्या डोळ्यांतील अश्रू आणि पालकांच्या चेहऱ्यावरील भावना पाहून उपस्थित अधिकारी-कर्मचारीही भावुक झाले. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
बंदींना आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने खाऊ देता यावा, यासाठी कारागृहातील उपहारगृहामार्फत बिस्किटे, चॉकलेट, सोनपापडी, चिवडा आणि वेफर्स आदी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. कारागृह प्रशासनाच्या वतीने पाल्यांसाठी पुलाव आणि फळांची व्यवस्था करण्यात आली होती. बंदींनी आपल्या कारागृहातील वेतनातून मुलांसाठी विविध खाद्यपदार्थ आणि चॉकलेटही खरेदी केले.
२२० पाल्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अनेक बंदींच्या कुटुंबात कमावणारी व्यक्ती नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत बंदींची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रयास–टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई, नागपूर हाऊसेस ऑफ मेरी इम्माकुलेट संस्था आणि मेरी सेलीयन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २२० पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्गानुसार स्कूल बॅग, पाठ्यपुस्तके, नोटबुक, रजिस्टर, कंपास पेटी, टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
कारागृह प्रशासनाच्या मते, बंदी आणि त्यांच्या मुलांमध्ये प्रत्यक्ष संवाद झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाबाबत तसेच कुटुंबातील अडचणी समजून घेण्यास मदत होते. त्याचबरोबर बंदींमध्ये कुटुंबाबद्दल सहानुभूती, जबाबदारी आणि आपुलकीची भावना निर्माण होऊन त्यांच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या प्रक्रियेलाही सकारात्मक दिशा मिळते.
कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक वैभव सु. आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा वै. आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मनोहर भोसले, वामन निमजे, तुरुंगाधिकारी उमेश गुंडरे, माधव खैरगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रयास सामाजिक संस्था, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते धनपाल मेश्राम, मीना लाटकर आणि कृष्णा पाडवी यांनी बंदींच्या पाल्यांशी संपर्क साधून त्यांना ‘गळाभेट’ कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ लिपिक राहुल बांबल, हवालदार किशोर चावरे, महिला शिपाई विद्या मेंढे, विठ्ठल उगले, मानिक सार्वे, सुभेदारश किशोर पडाळ, संजय गायकवाड, राजू हाते, राजू मांढरे, राजु कोसरे, जितेंद्र नेहारे, शैलेंद्र सोनवाने, उदय जाधव, हवालदार लवकुश चव्हाण, पंकज बुरडकर, अजित मोखाडे, लंकेश मेश्राम, धर्मपाल शेंदरे, मनिष शेंडे, सुभाषचंद्र शाहु, राकेश राऊत, वर्षा राऊत, रोशनी वाढई, दिपा कांबळे, संगीता वानखेडे, अर्चना कुदनर, अश्विनी भिवगडे यांच्यासह कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
Author: संतोष तायडे
संपादक











