मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकरीहिताचा ‘मास्टर स्ट्रोक’; कर्जमाफीची जुनी अट रद्द, दोन लाखांपर्यंत दिलासा

– महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांना; नागपूरसह राज्यभरातील शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण

The Exposer
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा सकारात्मक आणि संवेदनशीलतेने विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वपूर्ण आणि शेतकरीहिताचा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील जुनी अट रद्द करून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आल्याने नागपूरसह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी २०१९ मधील कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयातील अटी आणि लाभाची मर्यादा यावर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार रोहित पवार तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठविला होता.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरसकट कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय चांगलाच गाजला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. त्यांच्या मागण्या आणि अडचणी समजून घेत सर्व संबंधितांना विश्वासात घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या भावना आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून पूर्वीची अट रद्द करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कळमेश्वरच्या खुशाल चुरड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना लाभाची आशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मौजा उबगी येथील शेतकरी खुशाल गुलाबराव चुरड यांनी २०१६ मध्ये बँक ऑफ इंडियाकडून पीककर्ज घेतले होते. त्यांच्या शेतजमिनीचा खसरा क्रमांक ३२१/२ असून, नव्या निर्णयामुळे योजनेच्या पात्रता निकषांनुसार त्यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी बळ देणारा हा निर्णय असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळाल्यास शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आर्थिक नियोजन करणे सुलभ होणार असून शेती क्षेत्रालाही नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवादातून शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेत जुन्या अटीत बदल करण्याचा घेतलेला निर्णय जनहिताचा आणि लोकहिताचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचे राज्यातील विविध भागांतून स्वागत होत असून नागपूर जिल्ह्यासह राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.

कर्जमुक्तीचा नवा विश्वास’

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील जुनी अट रद्द करून कर्जमाफीची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याने अधिक पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊन नव्या हंगामाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांना बळ देणारा ठरणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More