– ज्ञानमंदिरात कर्मचारी की गुंड? बाऊन्सरचा खर्च कोण, का करतोय अन् ते कुणाच्या इशाऱ्यावर तैनात?
– दीक्षाभूमी आणि नामांकित महाविद्यालयाला बदनाम करण्यामागे कोणती प्रवृत्ती सक्रिय?
The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रकरणावरून विद्यापीठ आणि दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता महाविद्यालय परिसरातील कथित ‘बाऊन्सर संस्कृती’ गंभीर चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षण, शिस्त आणि वैचारिक मूल्यांचे केंद्र असलेल्या या नामांकित महाविद्यालयात खासगी सुरक्षेच्या नावाखाली बाऊन्सर तैनात करण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? महाविद्यालयात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत की दबाव निर्माण करण्यासाठी धाकदपटशा करणारी यंत्रणा उभी केली जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या महाविद्यालयात संवाद, संविधानिक मूल्ये आणि कायदेशीर प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासकीय अथवा वैयक्तिक वादात कथित बाऊन्सरचा वापर होत असल्याच्या आरोपांमुळे महाविद्यालयाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यवस्थापन, विद्यापीठ किंवा संबंधित व्यक्तींमध्ये मतभेद असतील, तर त्यांचा निपटारा नियमानुसार, संवादातून आणि कायदेशीर मार्गाने होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसमोर शक्तिप्रदर्शन करून दबाव अथवा भीतीचे वातावरण निर्माण करणे शिक्षणसंस्थेच्या संस्कृतीला शोभणारे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाऊन्सरचा खर्च कुणाच्या खिशातून?
महाविद्यालय परिसरात कथित बाऊन्सर तैनात करण्यात आले असतील, तर त्यांच्या वेतनाचा अथवा मानधनाचा खर्च नेमका कोण करीत आहे? हा खर्च महाविद्यालयाच्या निधीतून केला जात आहे का? विद्यापीठाच्या निधीतून, खासगी व्यक्तीकडून की अन्य कोणत्या माध्यमातून त्यांना पैसे दिले जात आहेत? याची अधिकृत माहिती सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा वापर अशा कथित बाऊन्सरच्या नियुक्तीसाठी होत आहे का? तसे असल्यास त्यासाठी कोणत्या सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली? संबंधित खर्चाची नोंद महाविद्यालयाच्या अधिकृत लेख्यांमध्ये करण्यात आली आहे का? याबाबतही पारदर्शकता आवश्यक आहे.
बाऊन्सर कुणाच्या इशाऱ्यावर तैनात?
कथित बाऊन्सर महाविद्यालयात कुणाच्या आदेशाने आणि कुणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत? त्यांना कोणत्या व्यक्तीने अथवा अधिकाऱ्याने नियुक्त केले? त्यांची जबाबदारी नेमकी काय आहे? त्यांना महाविद्यालय परिसरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याचा, चौकशी करण्याचा अथवा कोणावर दबाव निर्माण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाऊन्सरची नियुक्ती अधिकृत असेल, तर त्यासंबंधीचा आदेश, करार, निविदा प्रक्रिया, नियुक्तीचा कालावधी आणि त्यांच्या अधिकारांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी. नियुक्ती अनधिकृत असेल, तर महाविद्यालयासारख्या संवेदनशील शैक्षणिक परिसरात त्यांना प्रवेश कसा मिळाला आणि त्याची जबाबदारी कुणाची, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणामाची जबाबदारी कुणाची?
महाविद्यालयात विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. मात्र, परिसरात धिप्पाड खासगी सुरक्षारक्षक अथवा कथित बाऊन्सरचा वावर असेल आणि प्रशासकीय वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण होत असेल, तर त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही का? विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनासह विद्यापीठाचीही आहे.
वैयक्तिक वादात महाविद्यालयात ‘धुडगूस’ कुणाच्या परवानगीने?
कर्मचाऱ्यांचे वेतन, प्राचार्यपद, प्रशासकीय अधिकार किंवा वैयक्तिक मतभेद हे संबंधित संस्था आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार सोडविण्याचे विषय आहेत. मग अशा वादात कथित बाऊन्सरना महाविद्यालय परिसरात प्रवेश कुणाच्या आदेशाने देण्यात आला? त्यांच्या नियुक्तीला अधिकृत मान्यता आहे का? त्यांचा खर्च कोण करीत आहे? त्यांना कोणते अधिकार देण्यात आले आहेत? याची स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक आहे.
महाविद्यालयातील सुरक्षा महत्त्वाची असली, तरी सुरक्षा आणि शक्तिप्रदर्शन यामधील सीमारेषा स्पष्ट असली पाहिजे. सुरक्षेची खरोखरच गरज होती, तर अधिकृत पोलिस विभागाकडून सुरक्षेविषयी मदत का घेण्यात आली नाही? कथित बाऊन्सरची निवड करण्यामागील कारण काय, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दीक्षाभूमी आणि नामांकित महाविद्यालयाला बदनाम करण्याचे षडयंत्र?
जगभरातील अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीशी संबंधित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या या प्रतिष्ठित महाविद्यालयाची प्रतिमा व्यक्तिगत हितासाठी जाणीवपूर्वक आरोप-प्रत्यारोप आणि वादांमुळे मलिन करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.
दीक्षाभूमी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय ही केवळ संस्था नसून त्यांच्याशी लाखो अनुयायांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक वादासाठी, पदाच्या संघर्षासाठी अथवा हितसंबंधांसाठी या संस्थांच्या प्रतिष्ठेचा वापर केला जात असेल, तर त्यामागील भूमिका आणि हेतू समोर येणे गरजेचे आहे.
विद्यापीठाने मौन सोडावे—‘बाऊन्सर’ लावण्यामागे हित कुणाचे?
महाविद्यालयाशी संबंधित प्रशासकीय निर्णयांमध्ये विद्यापीठाची भूमिका असेल, तर कथित बाऊन्सर तैनातीबाबत विद्यापीठाला पूर्वकल्पना होती का? यासाठी विद्यापीठ अथवा सक्षम प्राधिकरणाची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित व्यक्तींची पडताळणी करण्यात आली का? या सर्व प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा गटाच्या हितासाठी महाविद्यालय परिसराचा वापर दबाव किंवा शक्तिप्रदर्शनाचे केंद्र म्हणून केला जात असेल, तर संबंधितांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
“ज्ञानमंदिरात पुस्तकांचा प्रभाव हवा; बाऊन्सरचा धाक नव्हे!”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले. त्यांच्या नावाने चालणाऱ्या महाविद्यालयात संवादाऐवजी कथित बाऊन्सर संस्कृती रुजत असल्याचा आरोप होत असेल, तर ही बाब केवळ प्रशासकीय वादापुरती मर्यादित राहत नाही. ती शिक्षणसंस्थेची प्रतिष्ठा, संविधानिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब ठरते.
नियुक्तीपूर्वी बाऊन्सरचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले काय?
महाविद्यालयासारख्या संवेदनशील शैक्षणिक परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च असताना, कथित बाऊन्सर म्हणून तैनात करण्यात आलेल्या व्यक्तींची नियुक्तीपूर्वी अधिकृत पोलिस पडताळणी करण्यात आली होती काय, असा गंभीर प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्तींची ओळख, पूर्वइतिहास, चारित्र्य पडताळणी तसेच त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे अथवा तक्रारी दाखल आहेत काय, याची अधिकृत तपासणी करण्यात आली का? याबाबत महाविद्यालय प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











