शांतीनगरात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

– तब्बल ५५ किलो गांजासह १६.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींना अटक

The Exposer
नागपूर : अमली पदार्थ विरोधी पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलाल चौक परिसरात धडक कारवाई करीत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, गांजा, रोख रक्कम, मोपेड, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असा एकूण १६ लाख ५१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख जावेद वल्द शेख मुन्ना राहीन (वय ३९) आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी (वय ३९) अशी आहेत. दोघेही दलाल चौक, बीच का पुलिया, तेलीपुरा, लालगंज, पेवठा, शांतीनगर परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी पहाटे २.३० ते सकाळी ५.१० वाजेदरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने दलाल चौकातील शेख वसीम शेख मेहमूद यांच्या घरासमोरील बंदिस्त टिनाच्या शेडवर कारवाई केली. दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपींची तसेच परिसराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा आणि अन्य साहित्य आढळून आले.

या कारवाईत १३ लाख ७४ हजार ९५० रुपये किमतीचा ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा, २६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची बर्गमन मोपेड, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेली एक लाख ३५ हजार ५७० रुपयांची रोख रक्कम तसेच १० हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १६ लाख ५१ हजार ५२० रुपये आहे.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब)(२)(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. फिर्यादी म्हणून अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे यांनी तक्रार दिली असून, प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More