– अमली पदार्थचा संशय व्यक्त करूनही दोन दिवस कारवाई नाही; रेल्वे पार्सल कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
The Exposer
नागपूर : बल्हारशहा रेल्वे स्थानकावर आलेल्या एका संशयास्पद पार्सलमधील ‘हँडमेड बिडी’मध्ये अमली पदार्थ अथवा गांजासदृश पदार्थ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, संबंधित पार्सलची तातडीने शास्त्रीय तपासणी करण्याऐवजी रेल्वे विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहाराचा खेळ सुरू असल्याची गंभीर बाब विश्व्सनिय सूत्रानुसार समोर आली आहे.
या प्रकरणात वेळेत तपासणी न झाल्याने संशयास्पद पार्सल अनेक दिवस पडून असल्याचा दावा करण्यात आला असून, संभाव्य अमली पदार्थांच्या वाहतुकीसारख्या संवेदनशील प्रकरणात संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विश्व्सनिय सूत्रानुसार, ७ जुलै २०२६ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत एएसआय, आरपीएफ यांनी संशयास्पद पार्सलबाबत माहिती दिली. रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात आलेल्या एका पार्सलमधील सुमारे दहा बंडलांपैकी एका बंडलात ‘हँडमेड बिडी’ आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या बिडीमधून गांजासदृश वास येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याबाबत सीपीसी/बीआरक्यूच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित पार्सलची पाहणी करण्यात आली. मात्र, केवळ वास अथवा प्राथमिक निरीक्षणावरून त्यामध्ये अमली पदार्थ आहे किंवा नाही, हे निश्चित करता येत नसल्याने तज्ज्ञांकडून तपासणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगून नागपूर विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर नागपूर येथील अन्न व औषध प्रशासनाला पत्र देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष तपासणी किंवा ठोस कार्यवाही होण्याऐवजी पुढील पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे.
या संदर्भात १० जुलै २०२६ रोजी रेल्वे पोलिस चौकी, बल्लारशाह येथे नोंद करण्यात आली. संशयास्पद पार्सलमधील पदार्थाची तातडीने तपासणी करून तो अमली पदार्थ आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पार्सल संशयाच्या भोवऱ्यात; यंत्रणा मात्र पत्रांच्या फेऱ्यात!
निवेदनानुसार, संशयास्पद पार्सल रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयासमोर पडून असून, दोन दिवस उलटूनही तपासणीसाठी ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पार्सल नेमके कुठून आले, ते कुणाच्या नावाने पाठविण्यात आले, त्याचा प्राप्तकर्ता कोण आणि त्यामध्ये नेमका कोणता पदार्थ आहे, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.
संभाव्य अमली पदार्थ वाहतुकीशी संबंधित बाब असल्यास तपासात होणारा विलंब गंभीर ठरू शकतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा, रेल्वे पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच अमली पदार्थविरोधी यंत्रणांनी समन्वय साधून पार्सलची तातडीने शास्त्रीय तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याची गरज
दरम्यान, निवेदनासोबत आरपीएफ अधिकाऱ्यांचा अहवाल, रेल्वे पार्सल कार्यालयाशी संबंधित पत्रव्यवहार तसेच अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आलेल्या पत्रांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. संशयास्पद पार्सलमधील पदार्थ नेमका काय आहे, हे अधिकृत फॉरेन्सिक प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यासाठी कुणी जवाबदारी घ्यायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं असून ही धक्कादायक बाब ठरली आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











