“माझ्या मुलांनाही मारा… नव्या भारतालाही संपवा!” – एका आईचा जंतर-मंतरवर आक्रोश!

– NEET पेपर लीकविरोधातील आंदोलनात दोन मुलांना हाताशी धरून आईचा संतप्त उद्गार

– शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची वेदनादायी भावना

The Exposer
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात एक असे दृश्य समोर आले, ज्याने हजारो आंदोलकांसह संपूर्ण देशाच्या संवेदनशील मनाला हादरवून सोडले.

दोन मुलांना सोबत घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या एका आईने पोलिसांसमोर अश्रूंनी भरलेल्या आवाजात संतप्त शब्द उच्चारले—“मी माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आले आहे… त्यांनाही मारा… नव्या भारतालाही मारा!” हा केवळ संताप नव्हता; तो एका आईच्या तुटलेल्या विश्वासाचा, मुलांच्या भविष्याबद्दलच्या भीतीचा आणि शिक्षण व्यवस्थेवरील निराशेचा हृदयद्रावक उद्गार होता.

स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्षे रात्रंदिवस मेहनत करणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा एका पेपर लीकमुळे धुळीस मिळाल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त होत आहे. अनेक पालकांच्या मते, मुलांनी केलेल्या प्रामाणिक परिश्रमांवर पाणी फेरले जात असून, त्यांच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

घटनास्थळी उपस्थित आंदोलकांनी या आईला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यांतील अश्रू आणि मुलांकडे पाहत केलेला आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांतही पाणी आले. हे दृश्य केवळ एका कुटुंबाचे नव्हते, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील वेदनेचे प्रतीक बनले.

नव्या भारतालाही मारा… म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या आणि ऐन तारुण्यात येणाऱ्या मुलांनाही संपवा. असा त्या आईचा आक्रोश होता.

शिक्षण ही देशाच्या भविष्याची पायाभरणी मानली जाते. अशा परिस्थितीत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विश्वास आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षितता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाज माध्यमावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जंतर-मंतरवरील त्या आईचा आवाज आजही एकच प्रश्न विचारत असल्याचे जाणवते—”आमच्या मुलांच्या स्वप्नांची किंमत नेमकी किती?” मात्र, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना केवळ एका आईचा नसून संपूर्ण भारताचा आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More