ट्रायल रूममध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे गुप्त चित्रीकरण, आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास

– पोक्सोसह आयटी कायद्यांतर्गत दोषी ठरवत न्यायालयाचा कडक संदेश 

The Exposer
नागपूर : महिलांच्या सुरक्षिततेवर घाला घालणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध न्यायालयाने कठोर भूमिका घेत, ट्रायल रूममध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे मोबाईलवरून गुप्त चित्रीकरण करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नागपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जे. मोडक यांनी २१ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल देत अशा गुन्हेगारांना कायदा कोणतीही सूट देणार नसल्याचा ठाम संदेश दिला.

शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७, पाचपावली, नागपूर) असे आहे. न्यायालयाने त्याला भारतीय न्याय संहितेतील (माजी भा.दं.वि.) कलम ३५४(क), पोक्सो कायद्याचे कलम १२ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(ई) अंतर्गत दोषी ठरवले. आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास, ४ हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

युनिफॉर्म खरेदीला गेलेल्या विद्यार्थिनीवर विकृत नजर

१० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी सीताबर्डी मार्केट परिसरातील ‘फ्रेंड्स’ शोरूममध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनी मैत्रिणीसह युनिफॉर्म खरेदीसाठी गेली होती. ती ट्रायल रूममध्ये कपडे बदलत असताना आरोपीने मोबाईलद्वारे तिचे गुप्त व आक्षेपार्ह चित्रीकरण केले. या कृत्यामुळे विद्यार्थिनीच्या सन्मानाला धक्का पोहोचला आणि तिचा विनयभंग झाला.

मसपोनि शुभदा संखे यांनी केला सखोल तपास

पीडितेच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तत्कालीन तपासी अधिकारी मसपोनि शुभदा संखे यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. साक्षी, तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.

सरकारी पक्षातर्फे ऍड. आसावरी परसोडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर आरोपीतर्फे ऍड. वाय. बी. मंडपे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी किरण कैथल व मिनल लोणारे यांनी न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर संदेश

हा निकाल केवळ एका आरोपीला झालेली शिक्षा नसून, प्रत्येक विकृत प्रवृत्तीला दिलेला कायद्याचा कडक इशारा आहे. ट्रायल रूम, सार्वजनिक ठिकाणे किंवा अन्यत्र महिलांचे, मुलींचे गुप्त चित्रीकरण, छेडछाड किंवा विनयभंग करणाऱ्यांवर कायदा कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More