– मानेवाडा घाटावरील भरदिवसा खूनानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
– अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती, कर्मचाऱ्यांवर दहशतीचे सावट
The Exposer
नागपूर : मानेवाडा स्मशानभूमी घाटावर प्रतिस्पर्धी गुन्हेगाराची भरदिवसा निर्घृण हत्या झाल्यानंतर नागपूर शहरातील स्मशानभूमी घाटांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेच्या वेळी घाटावर अंत्यसंस्कार सुरू असल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मृताच्या नातेवाईकांसह शेकडो नागरिकांसमोर घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरातील घाटांची सुरक्षा व्यवस्था किती कमकुवत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर शहरात मानेवाडा, सहकार नगर, दिघोरी, मोक्षधाम, गंगाबाई, शांती घाट, वैशालीनगर, मानकापूर, पारडी, अंबाझरी, वाडी आणि बेसा अशा एकूण १२ प्रमुख अंत्यसंस्कार घाट आहेत. स्थानिक नागरिक, घाटावरील कर्मचारी आणि परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापैकी अनेक घाटांवर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांचा वावर वाढल्याची चर्चा आहॆ.
दिवस असो वा रात्र, काही व्यक्ती घाट परिसरात गांजा सेवन करत तासन्तास बसून राहतात, सार्वजनिक जागेचा गैरवापर करतात आणि अनेकदा येणाऱ्या-जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे घाटावरील कर्मचारीही दहशतीखाली काम करत असल्याचे सांगितले जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी पोलिस गस्त अपुरी असल्याने अशा प्रवृत्ती अधिक बिनधास्त झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
मानेवाडा घाटावरील खूनाच्या घटनेने ही समस्या केवळ कायदा-सुव्यवस्थेची नसून सार्वजनिक सुरक्षेशी निगडित असल्याचे अधोरेखित झाले आहे. शहरातील सर्व स्मशानभूमींवर नियमित पोलिस गस्त, उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि अंमली पदार्थांचे सेवन व गुन्हेगारी प्रवृत्तींवर विशेष कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पवन सूर्यवंशीची हत्या; सात आरोपी गजाआड

नागपूर : मानेवाडा स्मशानभूमी घाटावर जुन्या वादातून १८ वर्षीय पवन निकेश सूर्यवंशी याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात अमन अजय काळे (२७) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अटक आरोपीमध्ये कुणाल धनराज चौरसिया (२४), वेदांत संदीप कापटे (२१), रौनक रमेश राव (२२), यश दिलीप लोटे (२५), देवांश प्रविण श्रीशे (२१), प्रज्ज्वल गिरीश नायडू (२०), अनुराग पराग शास्त्रकार (२०) यांचा समावेश आहॆ.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी पवन व त्याच्या मित्रांना फोन करून मानेवाडा स्मशानभूमी घाटावर बोलावले. तेथे धारदार शस्त्राने हल्ला करून पवनचा खून करण्यात आला.
Author: संतोष तायडे
संपादक











