– हुडकेशवर पोलिसांनी आवळला आरोपीविरुद्ध फास
The Exposer
नागपूर : मानेवाडा स्मशानभूमीत १८ वर्षीय पवन सूर्यवंशी याची भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येमुळे केवळ गँगवॉर आणि जुन्या वैमनस्याची शक्यता समोर आलेली नाही, तर शहरातील स्मशानभूमींच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंत्यसंस्कार सुरू असताना भरदिवसा आरोपींनी निर्भयपणे हल्ला केल्याने शहरातील स्मशानभूमी या गुन्हेगार आणि नशा खोरांचे सुरक्षित अड्डे बनत आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करून एकूण ११ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुणाल चौरसिया, वेदांत कापटे, रौनक राव, यश लोटे, देवांश श्रीरामे, प्रज्वल नायडू आणि अनुराग शास्त्रकार यांच्यासह एकूण नऊ आरोपींचा समावेश असून त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
त्यानंतर राजकुमार उर्फ लाला आणि करण यांनाही ताब्यात घेण्यात आले असून अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. रविवारी मुख्य आरोपी कुणालसह सात आरोपींना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून राजकुमार आणि करण यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमन काळे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समेटाच्या बहाण्याने घाटावर बोलावून जीवघेणा हल्ला
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाहन कट लागण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी २५ जुलै रोजी दुपारी आरोपींनी पवन आणि त्याच्या साथीदारांना समेटाच्या बहाण्याने मानेवाडा स्मशानभूमीत बोलावले. तेथे आधीच सापळा रचून धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, केवळ वाहन कटाचा किरकोळ वाद एवढ्या मोठ्या हत्येचे कारण असू शकतो का, की यामागे आणखी काही गंभीर गुन्हेगारी कारणे दडली आहेत, याची चर्चा शहरात सुरू असून याचे उत्तर पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
हत्येसाठी स्मशानभूमीचीच निवड का?
या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी भरदिवसा एवढी मोठी घटना कशी घडली? तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती का? सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत का? असल्यास ते कार्यरत होते का आणि त्यातील चित्रफीत सुरक्षित आहे का? जर कॅमेरेच नसतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? या सर्व बाबींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
गस्तीअभावी नशेखोर आणि गुन्हेगारांचा वावर
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मानेवाडा, गंगाबाई, मोक्षधाम, वैशालीनगर, सहकारनगर, दिघोरी, पारडी, मानकापूर, अंबाझरी, वाडी आणि बेसा येथील अनेक स्मशानभूमींमध्ये नियमित पोलीस गस्त नसते. त्यामुळे नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येथे तासन्तास वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन तसेच विविध बेकायदेशीर प्रकार या परिसरात सुरू असल्याचे आरोपही नागरिकांकडून केले जात आहेत. यापूर्वीही शहरातील काही स्मशानभूमींमध्ये अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत.
सागर सलामे हत्याकांडाची पुनरावृत्ती?
या घटनेची तुलना एप्रिल २०२६ मध्ये घडलेल्या सागर सलामे हत्याकांडाशी केली जात आहे. त्या प्रकरणातही समेटाच्या बहाण्याने अजनीतील जादू महल चौकात बोलावून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी १३ अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासात गांजा विक्रीतील वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले होते. पवन सूर्यवंशी हत्याकांड आणि सागर सलामे प्रकरणातील हल्ल्याची पद्धत साधर्म्य दर्शवत असल्याने शहरातील युवकांमध्ये वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अमली पदार्थांच्या जाळ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
आत्मसमर्पणाची चर्चा; अधिकृत दुजोरा नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील पाच आरोपींनी एका कुख्यात गुन्हेगाराच्या भावाच्या मध्यस्थीने आत्मसमर्पण केल्याची चर्चा आहे. त्यानंतर अजनी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने त्यांना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या वृत्ताला पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
नागरिकांची प्रमुख मागणी
या घटनेनंतर शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये नियमित पोलीस गस्त, उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
दरम्यान, या गंभीर हत्याकांडात हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करून ११ आरोपींना अटक करत तपासाला महत्त्वाची दिशा दिली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या हत्येमागील नेमके कारण, कटकारस्थान आणि संपूर्ण सत्य पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे म्हटले जाते. दुसरीकडे, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी मनपा सत्ता पक्ष नेते वेदप्रकाश आर्य यांनी सदर घटनेचे गंभीर्य बघता राज्याचे मुख्यमंत्री व शहर पोलिस आयुक्त यांना लक्ष घालण्याची विनंती समाज माध्यमाद्वारे केली आहॆ, हे विशेष.

Author: संतोष तायडे
संपादक











