सेंट्रल जेलमध्ये ‘खूनीचा खात्मा’! आयुष पुगलिया हत्याप्रकरणी सूरज कोटनाके ला जन्मठेप

– जिल्हा सत्र न्यायालयाचा कडक दणका, बॅरक क्रमांक ५ मध्ये निर्घृण हत्याकांड
– २१ साक्षीदार, फॉरेन्सिक अहवाल आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी

The Exposer
नागपूर : नागपूर सेंट्रल जेलमध्ये घडलेल्या बहुचर्चित आयुष पुगलिया हत्याकांडात जिल्हा व सत्र न्यायालयाने आज आरोपी सूरज कोटनाके याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि ₹१,००० दंड ठोठावला आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर तोतला (डीजे-२१) यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल आज सुनावला. सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, बाबुराव कुमरे हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी सूरज कोटनाके नागपूर सेंट्रल जेलच्या बॅरक क्रमांक ५ मध्ये बंद होता. त्याच बॅरकमध्ये असलेल्या आयुष पुगलिया याच्याशी झालेल्या वादानंतर आरोपीने प्रथम शौचालयाजवळ फरशीचा दगड डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर तुरुंगातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या चमच्याच्या हँडलचा धारदार शस्त्राप्रमाणे वापर करून गळ्यावर वार करत त्याची हत्या केली होती.

या गाजलेल्या प्रकरणात सरकारी पक्षाने २१ साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे, जप्ती पंचनामा, शवविच्छेदन अहवाल तसेच धंतोली येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) चा अहवाल न्यायालयात सादर केला. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी सूरज कोटनाकेविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाल्याचे नमूद केले. सरकारी अभियोक्ता श्याम खुबळे यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडत भक्कम युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने सूरज कोटनाकेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

विशेष म्हणजे, मृतक आयुष पुगलिया हा चर्चित कुश कटारिया हत्याकांडातील आरोपी होता. कारागृहाच्या आत झालेल्या या निर्घृण हत्येने त्यावेळी राज्यभर खळबळ उडवली होती आणि तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या निकालातून न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला आहे की, कारागृहाच्या चार भिंतीआड घडणारे गंभीर गुन्हेही कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत आणि दोषींना कठोर शिक्षा अटळ असल्याचे निकालातून समोर आले.

हत्येच्या पहिल्या प्रकरणातून झाला होता निर्दोष…

बहुचर्चित बापूराव कुमरे हत्याकांडात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपी सूरज विशेष कोटनाके (23) याला मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला होता. सरकार पक्षाला त्याच्याविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

यापूर्वी २ डिसेंबर २०१५ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने कोटनाकेला बापूराव कुमरे यांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. एन. ए. बदर यांनी बाजू मांडली होती.

मात्र, या निर्णयानंतरही कोटनाकेची कारागृहातून सुटका करण्यात आली नव्हती. कारण नागपूर मध्यवर्ती कारागृहात ११ सप्टेंबर २०१७ रोजी घडलेल्या आयुष पुगलिया हत्याकांडात तो आरोपी होता. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून तो अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, ६ मार्च २०१४ रोजी बापूराव कुमरे यांचा खून झाला होता.गावातील एका अंत्ययात्रेत सूरज व कुमरे हे दोघेही सहभागी झाले होते. मात्र, अंत्ययात्रेनंतर कुमरे हे घरी परतले नव्हते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप ठेवत सूरज कोटनाकेला अटक झाली होती. त्याला या हत्याकांड प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. मात्र, पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

आठ वर्षीय कुश कटारियाची आयुषने केली होती हत्या

२०११ मध्ये नागपुरात आठ वर्षांच्या कुश कटारियाचे चॉकलेटचे आमिष देऊन अपहरण व हत्या केल्याप्रकरणी आरोपी आयुष पुगलियाला उच्च न्यायालयाने तिहेरी जन्मठेप सुनावली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०१५ मध्ये आयुष पुगलियाची दुहेरी जन्मठेप कायम करत त्याला तिसरी जन्मठेपही सुनावली होती. यावेळी उच्च न्यायालयाने शिक्षेची व्याप्ती वाढवली पण शासनाची फाशीची मागणी फेटाळून लावली होती.

तेव्हा पासून तो कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान ११ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आयुष पुगलियाची कुमरे हत्याकांड प्रकरणी शिक्षा भोगत असलेला कैदी सूरज कोटनाकेने फरशीने व धारदार लोखंडी पट्टीने वार करून हत्या केली होती कैद्यांमधील आपापसांतील जुन्या वादातून ही घटना घडल्याचे त्यावेळी सांगितले गेले होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More