– अजनी परिसरात राठौर दाम्पत्याला अश्रुपूर्ण निरोप
The Exposer
नागपूर : अजनी रेल्वे कॉलनीजवळील साकेत नगर, प्लॉट क्रमांक 90 येथील ज्येष्ठ नागरिक मिठ्ठूसिंह पुत्तुसिंह राठौर (वय 94) आणि त्यांच्या पत्नी शांतीदेवी मिठ्ठूसिंह राठौर (वय 84) यांच्या अल्पावधीत झालेल्या निधनाने संपूर्ण अजनी परिसर शोकमग्न झाला आहे. आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ निभावणाऱ्या या दाम्पत्याने अखेरच्या प्रवासातही एकमेकांची साथ सोडली नाही. सोमवारी सकाळी मिठ्ठूसिंह राठौर यांचे निधन झाले, तर त्याच दिवशी सायंकाळी शांतीदेवी राठौर यांनीही अखेरचा श्वास घेतला. या हृदयस्पर्शी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिठ्ठूसिंह राठौर यांच्यावर सोमवारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शांतीदेवी राठौर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11 वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राठौर कुटुंब हे अजनी परिसरातील एक प्रतिष्ठित आणि सर्वपरिचित कुटुंब म्हणून ओळखले जात होते. पूर्वी त्यांचे किराणा दुकान होते. त्यानंतर त्यांनी अजनी रेल्वे कॉलनी परिसरात चहा-नाश्त्याचे हॉटेल सुरू केले. आपल्या साधेपणाने, मनमिळावू स्वभावाने आणि प्रेमळ वागणुकीने त्यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि चाहता वर्ग निर्माण झाला होता.
सामाजिक आणि धार्मिक कार्यातही राठौर दाम्पत्य नेहमीच अग्रेसर होते. परिसरातील दुर्गा मंदिर आणि हनुमान मंदिरात ते दरवर्षी विधिवत पूजा-अर्चा करीत. तसेच वर्षातून दोन वेळा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करून समाजसेवेची परंपरा जपत असत. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे परिसरात त्यांना विशेष मान-सन्मान मिळत होता.
राठौर दाम्पत्याच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक, ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने अजनी परिसराने दोन प्रेमळ, सेवाभावी आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वे गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
राठौर दाम्पत्य आपल्या मागे मोठा आप्त xपरिवार, नातेवाईक, मित्रपरिवार आणि असंख्य हितचिंतक असा मोठा परिवार सोडून गेले आहेत. त्यांच्या स्मृतींना परिसरातील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Author: संतोष तायडे
संपादक











