– ॲड. प्रकाश आंबेडकर यांची गौरवपूर्ण प्रतिक्रिया
The Exposer
नागपूर : आंबेडकरी साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, बौद्ध धम्माच्या प्रचारक आणि सामाजिक चळवळीतील समर्पित कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुलकर्णी (बोधी) यांच्या संघर्षमय, वैचारिक आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित “बोधीपर्व” हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, वैचारिक आणि धम्मसेवेच्या कार्याचा गौरव करणारा हा ग्रंथ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हा गौरवग्रंथ मुंबईतील राजगृह येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रंथाचे कौतुक करताना, “बोधीपर्व हा अत्यंत उत्कृष्ट गौरवग्रंथ असून, डॉ. रूपाताई यांच्या चळवळीतील त्याग, समर्पण आणि कार्याचे प्रभावी दस्तऐवजीकरण या ग्रंथातून झाले आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. यावेळी केवल जिवनतारे, रवी गजभिये, आनंद डेकाटे, नरेश वाहाणे, बंटी उके, अमन सोनटक्के उपस्थित होते
‘बोधीपर्व’ मध्ये डॉ. रूपाताई कुलकर्णी (बोधी) यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. सामाजिक प्रश्न समजून घेण्याची जिज्ञासा, त्यावर उपाय शोधण्याची हातोटी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या सर्वोदयी विचारांचा प्रभाव, पुरोगामी वैचारिक संस्कार, तसेच संस्कृत, पाली आणि प्राकृत भाषांवरील प्रभुत्व या गुणांमुळे रूपाताईंचे कार्य अधिक व्यापक झाले.
समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटक, विशेषतः घरकाम करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांच्यासाठी शासनाकडून न्याय आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी रूपाताईंनी अत्यंत कुशलतेने काम केले.
तसेच, ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांनी स्वीकारलेली बौद्ध धम्माची दीक्षा हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. डॉ. रूपाताई कुलकर्णी (बोधी) यांनी आंबेडकरी विचार, बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांतून आणि सामाजिक कार्यातून समता, बंधुता, न्याय आणि मानवतावादी मूल्यांचा सातत्याने प्रसार केला आहे.
“बोधीपर्व” हा केवळ एका व्यक्तीचा गौरवग्रंथ नसून, आंबेडकरी चळवळ, बौद्ध धम्मप्रसार आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाचा जिवंत दस्तऐवज आहे. डॉ. रूपाताई कुलकर्णी (बोधी) यांच्या संघर्ष, वैचारिक निष्ठा आणि धम्मसेवेचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीला दिशा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Author: संतोष तायडे
संपादक











