कळमना पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अट्टल दोन चोरटे जेरबंद

– अवघ्या काही दिवसांत लावला छडा; ९ लाखांचा ऐवज जप्त

The Exposer
नागपूर : कळमना पोलिसांच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला.

फिर्यादी राजू केशवराव बुटके (वय ५७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते २३ जून ते २४ जून २०२६ दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरा व रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमित गणपत मेश्राम (१९, जरीपटका) आणि ध्रुव राजेश बिरखल (२०) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीतील सोन्याचे पदक, कानातील दागिने, एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, कॅमेरा व इतर मौल्यवान वस्तूंसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-५) नित्यानंद झा तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (कळमना विभाग) रोहित ओटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत तपास पथक प्रमुख सपोनि अजय जाधव, पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार अनिल जाधव आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहोकार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत ही यशस्वी कारवाई पार पाडली.

— The Exposer

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More