देहव्यवसायावर गुन्हेशाखेचा मोठा धडाका; वाठोड्यातील स्पामध्ये छापा

– दोन जण अटकेत, तिघी महिलांची सुटका, संचालिका फरार

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हेशाखा युनिट क्र. ५ ने अवैध देहव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत वाठोडा परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून देहव्यवसायासाठी वापरल्या जात असलेल्या तीन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, स्कॅनर, फोन-पे क्यूआर बॉक्ससह सुमारे ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाठोडा परिसरातील एका कलेक्टरने या अड्डयाला आजवर संरक्षण दिले होते, अशी आता उलट सुलट चर्चा रंगली आहॆ.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हेशाखा युनिट क्र. ५ चे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना वाठोडा हद्दीतील वाठोडा ले-आऊट, जय जलाराम नगर, गोपालकृष्ण लॉन्ससमोर, एका स्पा सेंटरमध्ये अवैध देहव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

या कारवाईत सारिका चंद्रकांत श्रीराव (४८) व चंद्रकांत दिवाकर श्रीराव (५१) यांना ताब्यात घेण्यात आले. तर स्पा सेंटरची कथित संचालिका कामिनी कुमारी (२५), मूळ रा. बेगुसराय (बिहार), सध्या पारडी, नागपूर हिचा शोध सुरू आहे.

तपासात आरोपी आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहक उपलब्ध करून देत त्यांच्याकडून अनैतिक देहव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ५,१८० रुपये रोख, ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी ठेवलेले फोन-पेचे दोन क्यूआर बॉक्स, स्कॅनर, पाच मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ६७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), ३(५) तसेच अनैतिक देहव्यवसाय प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार महिला आरोपीचा शोध आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विनायक गोल्हे व त्यांच्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More