– कन्हान पोलिसांची २४ तासांत धडाकेबाज कारवाई
– लग्न आणि गिफ्टच्या वादातून संतापाचा स्फोट
– आरोपीला बेड्या; ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
The Exposer
नागपूर : फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सुरू झालेल्या भेटीचा शेवट थेट खुनात झाला. नागपूरच्या खामला परिसरातील अश्विनी सुरेश डे (वय २९) हिचा मृतदेह कन्हान नदीवरील जुन्या पुलाखाली आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र कन्हान पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत या खुनाचा उलगडा केला आणि मृत तरुणीचा मित्र आशीष उर्फ मोनू किशोर मनपिया (वय ३१) याला नागपूरच्या ऑटोमोबाईल चौक परिसरातून अटक केली. न्यायालयाने आरोपीला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच एसडीपीओ संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मांढवधरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
रेल्वे ट्रॅकमनच्या सतर्कतेने उलगडले हत्येचे गूढ
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री गस्त घालत असलेल्या रेल्वे ट्रॅकमनला कन्हान नदीवरील जुन्या रेल्वे पुलाजवळून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असता पुलाखाली एक महिला पडलेली दिसली. तात्काळ कन्हान पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपास
सुरुवातीला तपासास कोणताही ठोस धागा मिळत नव्हता. मात्र घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. अखेर ऑटोमोबाईल चौक परिसरातून आरोपी आशीष मनपिया याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
लग्न कर, गिफ्ट दे… वाद विकोपाला
पोलिस तपासानुसार, रविवारी सायंकाळी आशीष अश्विनीच्या घरी गेला होता. अश्विनी घरी आल्यानंतर तिने आईला आशीषला सोडून येत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे शहरात फिरत मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास कन्हान येथे पोहोचले.
जुन्या पुलाजवळ लग्न करण्याच्या मागणीवर आणि फ्रेंडशिप डेच्या गिफ्टवरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने अश्विनीला थेट पुलावरून खाली ढकलले. गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे हा खून लवकर उघडकीस आला.
हत्येनंतर मंदिरात दर्शन, नंतर पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न
घटनेनंतर आरोपी खापरखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात गेला. त्यानंतर दुचाकीवरून विविध भागांत फिरत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या.
प्राथमिक तपासात आरोपी आणि मृत तरुणी दोघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आशीषविरुद्ध यापूर्वी सुमारे १० गुन्हे, तर अश्विनीविरुद्ध दोन गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येचा तपास अद्याप सुरू असून इतर सर्व बाजूचीही कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











