– शासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभवाचा संशोधनासाठी उपयोग; सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सेवाविषयक समस्यांचा पीएच.डी. प्रबंधातून सखोल वेध
The Exposer
नागपूर : शासकीय सेवेत प्रदीर्घ काळ काम केल्यानंतरही सामाजिक प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी कायम ठेवत समाजकल्याण विभागाचे सेवानिवृत्त सहआयुक्त रमेश डी. आत्राम यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोलाम या आदिम जमातीच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सेवाविषयक विकासातील समस्या व अडथळ्यांचा त्यांनी आपल्या पीएच.डी. संशोधनातून सखोल वेध घेतला आहे.
झरी जामणी तालुका (जि. यवतमाळ) येथील कोलाम आदिम जमातीच्या विकासातील घटक, समस्या आणि त्यांचे परिणाम या विषयावर आत्राम यांनी संशोधन केले. या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.
शासकीय अनुभवाची संशोधनाला जोड
समाजकल्याण विभागात दीर्घकाळ काम केल्यामुळे शासकीय योजना, प्रशासकीय प्रक्रिया आणि आदिवासी विकासासमोरील आव्हानांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपली अभ्यासवृत्ती कायम ठेवत या अनुभवाचा उपयोग संशोधनासाठी केला. कोलाम समाजाच्या विकासप्रक्रियेतील अडथळे, सामाजिक व आर्थिक परिस्थिती तसेच शैक्षणिक समस्यांचा त्यांनी अभ्यास केला.
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी अधोरेखित
कोलाम या आदिम जमातीसाठी शासनाच्या विविध विकासात्मक योजना अस्तित्वात असतानाही प्रत्यक्ष विकासाच्या प्रक्रियेत कोणत्या अडचणी निर्माण होतात, योजनांचा लाभ मिळविताना कोणते अडथळे येतात आणि त्याचा समाजाच्या प्रगतीवर काय परिणाम होतो, या महत्त्वपूर्ण बाबींचा संशोधनात ऊहापोह करण्यात आला आहे. या संशोधनासाठी पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. अशोक सलामे यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
शासकीय सेवेत मिळविलेल्या अनुभवाची जोड सामाजिक संशोधनाला देत रमेश आत्राम यांनी निवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेचा प्रवास सुरू ठेवला आहे. कोलाम आदिम जमातीच्या विकासातील प्रश्नांना शैक्षणिक संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित करणारी त्यांची ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















