शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी ‘धानोरकर पॅटर्न’ची गरज!

– ऑटोचालकांच्या मनमानीला लगाम; नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्तीची हवी नवी दिशा
The Exposer
नागपूर : संत्रानगरीतील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत असून, ऑटोचालकांच्या वाढत्या मनमानीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सीताबर्डी, गणेशपेठ, महाल, रामदासपेठ, इमामवाडा यांसारख्या प्रमुख भागांत वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत शहरात पुन्हा एकदा ‘धानोरकर पॅटर्न’ राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सन २००६ ते २०१० या काळात शहर वाहतूक पोलिस विभागात कार्यरत असताना तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनिल धानोरकर यांनी शहरातील वाहतूक शिस्तीवर प्रभावी नियंत्रण मिळवले होते. नियम मोडणाऱ्या ऑटोचालकांवर कठोर कारवाई, चौकांवरील बेशिस्त वाहनांना आळा आणि रस्ते मोकळे ठेवण्याच्या त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेषतः चौरस्त्याच्या वळण मार्गांवर धोकादायकरित्या वाहने उभी करून ठेवणाऱ्या वाहणावर त्यांची विशेष नजर राहत असे. त्या काळात धानोरकर यांच्याकडे बुलेट होती. त्यांची बुलेट रस्त्यावर दिसली की बेशिस्त वाहनचालकांची धावपळ सुरू व्हायची. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई ही त्यांची ओळख होती. परिणामी चौकांमध्ये शिस्त निर्माण झाली आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला.

आजची परिस्थिती चिंताजनक

सध्या अनेक भागांत ऑटोचालकांकडून रस्त्याच्या, चौकाच्या मध्यभागी वाहने उभी करणे, विनाकारण वाहतूक अडवणे आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिस विभागाने ‘धानोरकर पॅटर्न’ तातडीने अमलात आणावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More