– उघड्या चेंबर्सवरून संतापाची लाट, अपघाताची वाट पाहतेय मनपा?

The Exposer
नागपूर : भाजप आमदार मोहन मते यांच्या विधानसभा मतदार संघातर्गत येणाऱ्या प्रभाग 34 मधील गजानन नगर, ओंकारनगर, रिंग रोडवरील गजानन मंदिर परिसरात मागील चार महिन्यांपासून रस्ते व स्टॉर्म वॉटर लाईनचे काम सुरू असून अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. या रखडलेल्या कामांमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे गटार लाईनची अनेक चेंबर्स उघडी पडलेली असून काही ठिकाणी झाकणे आतमध्ये कोसळले आहेत. त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटार लाईन पूर्णपणे चोकअप झाल्याने सांडपाणी साचत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही संबंधित अधिकारी केवळ आश्वासने देत असल्याचा आरोप आहे. “हो, काम करतो” असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात कोणताही अधिकारी पाहणीसाठी किंवा समस्या सोडविण्यासाठी येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
परिसरातील उघड्या चेंबर्समुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या कंत्राटदारांवर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि परिसरातील निष्क्रिय नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, निवडणुकांच्या वेळी मतांसाठी दारोदारी फिरणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. चार महिन्यांपासून रखडलेली विकासकामे, उघडी चेंबर्स, चोकअप गटार लाईन आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे.
नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, रखडलेली कामे पूर्ण करावीत आणि उघड्या चेंबर्सना सुरक्षित झाकणे बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











