– ‘भूखंड खाली करा, नाहीतर २५ लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकतो’
– धमकी प्रकरणात एसीपींकडून गुन्हे शाखा निरीक्षकांना क्लीन चिट; तक्रारदाराचे आरोप फेटाळले
The Exposer
नागपूर : “आठवड्याभरात भूखंड खाली करा, अन्यथा २५ लाख रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात कारागृहात डांबतो,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्यावर करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाच्या चौकशीनंतर कळमना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) राहुल ओव्हाळ यांनी निरीक्षक गोल्हे यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल ताराचंद सहारे यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे तक्रार करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी भूखंडाच्या वादातून दबाव टाकत धमकी दिल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची चौकशी एसीपी राहुल ओव्हाळ यांनी केली. चौकशीदरम्यान संबंधित कागदपत्रे, तक्रारदाराचे निवेदन तसेच उपलब्ध पुराव्यांची तपासणी करण्यात आली.
चौकशी अहवालानुसार, तक्रारदाराने केलेल्या आरोपांना कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. तसेच धमकी दिल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यासंदर्भात कोणतेही ध्वनिमुद्रण, साक्षीदार किंवा इतर भौतिक पुरावे उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचे निष्पन्न झाले नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तसा दावा तक्रारदार सहारे यांना एसीपी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या संयुक्त उत्तराद्वारे करण्यात आला.
एसीपी राहुल ओव्हाळ यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, संबंधित प्रकरणात पोलीस चौकशी सुरू असून तक्रारदाराने केलेल्या आरोपांना आधार देणारे कोणतेही विश्वसनीय पुरावे समोर आलेले नाहीत. परिणामी, निरीक्षक गोल्हे यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप सिद्ध होत नसल्याने त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे तक्रारदाराच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची चौकशी निष्पक्षपणे झाल्याचा दावा पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील पोलीस वर्तुळात आणि संबंधित भूखंड वादाच्या चर्चेत नव्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या प्रकरणी एसीपी गुन्हे शाखा व यशोधरानगर पोलिस ठाणे यांच्याकडुनही चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











