आम्ही उठाव साहित्य मंचाची स्थापना केल्यानंतर काही कव्वाली क्षेत्रातील मातब्बर कवीही आमच्याबरोबर जोडले गेले. त्यातील ठळक नाव म्हणजे आंबेडकरी महाकवी लक्ष्मणजी केदार. केदारदादा त्यावेळेस वृध्दावस्थेकडे झुकले होते. तरीही कोणाला तरी सोबत घेऊन ते उठावच्या मासिक कविसंमेलनाला आवर्जून हजेरी लावायचे. या वयातही ते कवितेमध्ये नवनवीन प्रयोग करायचे. एकदा त्यांनी मला एक गझल दाखवली. या गझलचे वेगळेपण हे होते की, प्रत्येक गझलला अंत यमक असतो. केदार दादांनी ही गझल आद्य यमकामध्ये लिहली होती. मला वाटतं आद्य यमकामध्ये गझल लिहणारे केदार दादा हे एकमेव गझलकार असतील. केदार दादांकडून खुप शिकण्यासारखे होते. पण केदार दादा खुपच लवकर आपल्या सर्वांना सोडून गेले. केदार दादा नेहमीच अभिमानाने सांगायचे की, होय मी उठावचा कवी आहे. केदार दादांच्या निधनाने आमच्या उठावचे प्रचंड नुकसान झाले. दादांच्या क्रांतिकारक स्मृतीला विनम्र अभिवादन!
त्यानंतर आठवण येते ती आमच्या मुलुंडच्या हृदयनाथदादा सिन्नरकर यांची. सिन्नरकर दादांच्या अनेक रचना मोठमोठ्या गायकांनी गायल्या आहेत. एवढा मोठा हा कवी आमच्या सारख्या पोरसवदा मुलांबरोबर आपलं मोठेपण विसरुन उठावमध्ये सामिल झाला. माझ्या माहितीनुसार त्यांचा ‘कत्तलखाना’ नावाचा कवितासंग्रह फार उशीरा प्रसिद्ध झाला. त्यांची शब्दकळा खुपच उच्च श्रेणीची होती. तुम्हाला मंगेश पाडगावकरांचं, श्रावणात घननिळा बरसला, हे गाणं माहीत असेल. या गीताचं वैशिष्ट्य हे की, हे शास्त्रीय संगीतातील गीत आहे आणि या गीताचं प्रत्येक कडवं वेगवेगळ्या चालीत आहे. त्यामुळेच या गीताच्या चालीवर बाबासाहेबांच गाणं करायच्या भानगडीत कोणी कवी पडला नाही. अपवाद फक्त हृदयनाथदादा सिन्नरकर. दादांनी हे चॅलेंज स्विकारलं आणि अगदी त्यावर त्यांनी कट टू कट बाबासाहेबांचं गाणं लिहलं. त्या गाण्याचे बोल होते, भारतात भिमराव गरजला, सदोदित सदवचनाने! दादांच्या या गाण्याचं सोनं केलं आमच्या दत्ता खरातांनी. दत्ता खरात तबल्याच्या ठेक्यावर अत्यंत सुंदर हरकती घेऊन जेंव्हा हे गाणं गातात, ते ऐकणं म्हणजे खरोखरच मेजवानीच असते. दत्ता खरात पूर्वी आमच्याच चाळीत रहायचे. आता ते घाटकोपरच्या रमाबाई काॅलनीत राहतात. तर सांगण्याचा विषय हा की, हृदयनाथ दादांच्या प्रत्येक रचना वाचल्या की असं वाटतं हे कोण्या उच्चभ्रू माणसाचच लिखाण आहे. आज हृदयनाथ दादाही आपल्यात नाहीत. दादांचा सहवास आम्हाला लाभला. आज आम्ही जे काही आहोत त्याला ही मोठी माणसे कारणीभूत आहेत.
याच मुलुंडच्या डंपिंग रोडवर विलास घोगरे, साजन शिंदे, अण्णा डोळस रहायचे. त्यापैकी विलास घोगरे तर आमच्या उठावचे संस्थापकच होते. अण्णा डोळस ‘अन्नाडी’ या टोपण नावाने कविता लिहायचे. अन्नाडी म्हणजे अण्णा डोळस या नावाचा विचित्र शॉर्टफॉर्म होता. तसही स्वतःला जाहीरपणे अन्नाडी म्हणणं हे भल्या भल्यांना जमत नाही. पण आमच्या अण्णांना हे सहज जमून गेलं. साजन शिंदेंच्या तरल गझला त्यांच्याच आवाजात ऐकणं हा अवर्णनीय अनुभव असायचा. त्यांची उर्दूवर प्रचंड पकड होती. त्यांच्या उर्दू गझलही श्रवणीय असायच्या. आज विलास घोगरे व साजनजीही हयात नाहीत. या ग्रुपमधले किरण सोनावणे मुलुंड पूर्वेला राहतात. त्यांच्याही गेय रचना अत्यंत प्रभावी आहेत. गाण्यातूनही परखड असा विद्रोह व्यक्त करता येतो, हे किरणजींची गाणी ऐकली की कळतं. ‘हे मुला भिमसंदेश तुला, बन सेवक समाजाचा!’ व ‘दारु म्हणजे मानेवरची सुरी हो! ही त्यांची दोन गाणी मला नेहमीच आवडतात. ही सर्व जेष्ठ मंडळी केवळ कवितेच्या प्रेमामुळे उठावच्या मासिक कविसंमेलनाला आवर्जून उपस्थित असायची.
आणखीन एक नाव आठवतं. ते म्हणजे आमच्या चाळीतले शाहीर धर्मराज गायकवाड. अत्यंत सुरेल पेटी वाजवायचे. धर्मराज आम्हाला सांगायचे की, रेसकोर्सला राहणारा प्रभाकर पोखरीकर माझ्याकडे पेटी शिकायला यायचा. पुढे पोखरीकरांचं मोठं नाव झालं. मी त्याला म्हणालो, माझं पण एक गाणं गा. पण त्याने ते गायलच नाही. आज शाहीर धर्मराज गायकवाडसुध्दा हयात नाहीत. माझ्याबरोबर येऊन त्यांनाही मुक्तछंदात कविता लिहण्याचा नाद लागला आणि ते सुध्दा आमच्या उठावमध्ये सामिल झाले. त्यांना स्वतःचा एक कवितासंग्रह काढायचा होता. ती इच्छा त्यांची अपूर्णच राहिली.
आपल्याला विश्वास बसणार नाही. पण भारतीय दलित पँथरचा वैचारिक सेनापती आणि फर्डा वक्ता असणारे प्राध्यापक अरुण कांबळेही आमच्या उठावचे सभासद झाले होते. एकदा तर लोकशाहीर विठ्ठलदादा उमपांनी कहरच केला. दर जयंतीला विद्याविहारला उठावचं कविसंमेलन व्हायचं. एका वर्षी अचानक विठ्ठलदादा आमच्या कविसंमेलनात हजर झाले. मी सूत्रसंचालन करत होतो. त्यांना पाहताच मी त्यांना सन्मानाने स्टेजवर बोलावलं. आणि मग जेंव्हा मी विठ्ठल दादांना कविता म्हणावयास सांगीतली तेंव्हा ते म्हणाले, मुक्तछंदातले माझे गुरु मुक्तछंदाचे बादशहा विवेक मोरेंना मी विनम्रपणे जयभीम करतो. हे ऐकल्यावर तर मी एकदमच विस्मयचकित झालो. खरं तर विठ्ठल दादासारख्या थोर माणसाचा गुरु होण्याची माझी अजिबात लायकी नाही, हे मला चांगलच माहीत होतं. पण विठ्ठलदादांचा हा नम्रपणा पाहून हा खरोखरच मोठा माणूस आहे, याची मला जाणीव झाली. आणि त्याचक्षणी मी दादांच्या पाया पडलो.
उठावच्या प्रवासात अशी अनेक माणसे भेटली. त्यांची यादी खुपच लांबलचक आहे. त्यांच्याविषयी मी पुढे कधीतरी सांगेन. पण दोन कवींची मात्र मला इथे दखल घ्यावीशी वाटते. एक कवी आमच्या उठावच्या मासिक कविसंमेलनात नियमीत यायचा. त्याच्या कविताही तशा खुपच साध्या असायच्या आणि तो दिसायलाही तसा सामान्यच होता. मी खुप दिवस त्याच्यावर लक्ष ठेऊन होतो. एकदा मात्र मी त्याला जवळ बसवून त्याची आस्थेने विचारपूस केली. तो सायनच्या एका चपलेच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत होता. मी त्याला नाव विचारले. तेंव्हा तो मला म्हणाला, माझं नाव संदिप भगत. मी शाहीर संभाजी भगतचा सख्खा चुलत भाऊ आहे. भगतचा भाऊ म्हटल्यावर मला त्याच्याविषयी विशेष आपुलकी वाटायला लागली. मग मी त्याच्या कवितेविषयी चर्चा केली, थोडं मार्गदर्शन केलं आणि त्याला म्हटलं लिहीत रहा. चांगलं लिहतोस तू. भविष्यात याहून चांगलं लिहू शकतोस. पण लिहणं सोडू नकोस. आजही संदिप माझ्या संपर्कात आहे आणि विशेष म्हणजे त्याने लिहणं सोडलेलं नाही.
दुसर्या कवीचं नाव राजेश कडलाक. आता तो नाही. करोना काळात तो गेला. पण त्याच्यासारखा हरहुन्नरी माणूस मी अद्याप पाहिला नव्हता. म्हणजे तो ॲक्टर होता, डान्सर होता, पत्रकार होता, फोटोग्राफर होता, बौध्दाचार्य होता आणि कवीही होता. एक माणूस इतका ऑलराऊंडर असू शकतो हे मला राजेश भेटायच्या आधी जर कोणी सांगितलं असतं तर मी मान्यच केलं नसतं. तोही आमच्या उठावचा कवी म्हणून आमच्यात सामिल झाला होता. एकदा दामोदर मोरे सूत्रसंचालन करत होते. तेव्हा राजेशने चळवळीवरची एक कविता म्हटली. कविता अशी……
“एक दोन तीन चार,
नामांतराचा जयजयकार.
पाच सहा सात आठ,
नेते झाले भरमसाठ.
नऊ दहा अकरा बारा,
विखुरला आहे समाज सारा!”
संपली कविता. यावर दामोदर मोरे म्हणाले, बरं झालं या कवीने बारावरच आटोपलं. नाहीतर पुढे जाऊन हा म्हणाला असता, तेरा चौदा पंधरा सोळा, कवी आला पळा पळा!
तर अशा ह्या गमती, जमती. या भावी पिढीलाही अवगत असणं गरजेचं आहे. तसं उठावने काही फार मोठा इतिहास रचलाय, हा आमचा अजिबात दावा नाही. पण आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत कणभर का होईना उठावचं योगदान आहेच. कुठेतरी एक शिर्षक वाचलं होतं, एका मुंगीचं महाभारत! म्हणजे क्षुल्लक वाटणार्या एका मुंगीच्याही जीवनात महाभारत घडत असतं. अगदी तसच काहीसं मला उठाव बद्दल वाटतं. आपल्याला हे आवडलं तर पुढेही काही आठवणी आपल्याशी शेअर करीन. तुर्तास थांबतो. जयभीम!
– विवेक मोरे, मुंबई
Author: संतोष तायडे
संपादक











