आठ दिवसांपासून गीतानगरमधील स्ट्रीट लाईट बंद!

– झाड कोसळून स्ट्रीट लाईट फुटली; वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म
– फांद्याही रस्त्यावरच पडून, मनपाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त

The Exposer
नागपूर : बेसा-मानेवाडा मार्गावरील गीतानगर परिसर गेल्या आठ दिवसांपासून अंधाराच्या विळख्यात असून, महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे झाड स्ट्रीट लाईटच्या खांबावर कोसळले. या दुर्घटनेत लाईट फुटून वीजपुरवठा प्रभावित झाला. मात्र, महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप समस्या सोडविण्यात आलेली नाही.

गीतानगरातील एसव्ही/१४/ईएक्सटी/१/४ आणि एसव्ही/१४/ईएक्सटी/१/४/२ या दोन विद्युत खांबांवरील दिवे गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. परिणामी रात्री संपूर्ण परिसरात काळोख पसरत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

आंब्याच्या झाडाच्या फांदया भुसारी यांच्या घरासमोर कोसळला होता. त्यानंतर स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्यासह रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटविण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे नागरिकांनी वारंवार फोन करून विनंती केली. मात्र, आठ दिवस उलटूनही ना स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आले, ना पडलेल्या फांद्या हटविण्याची तसदी प्रशासनाने घेतली.

पावसाळ्यामुळे परिसरातील कचऱ्यात विषारी जीव-जंतू आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालताना साप किंवा विंचू चावण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. अशा परिस्थितीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

“कर वसुलीत तत्पर, मग सेवा देताना मनपा सुस्त का?”

“महापालिका दरवर्षी नागरिकांकडून कर वसूल करते. वेळेत कर न भरल्यास व्याज आकारते आणि तरीही थकबाकी न भरल्यास नागरिकांच्या मालमत्तेच्या लिलावाची कारवाई करते. मग नागरिकांना मूलभूत सेवा देण्याची वेळ आली की प्रशासन एवढे सुस्त का होते?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, हनुमाननगर झोनच्या आरोग्य विभागातील संजय गौरे यांनी ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे सांगितले. मात्र, आठ दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांना आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कारवाईची प्रतीक्षा आहे. स्थानिक नागरिकांनी बंद असलेले दोन्ही स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्यासह रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि कचरा त्वरित हटविण्याची मागणी केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More