भंतेजींची दिशाभूल थांबवा; चिवराचा सन्मान राखत दीक्षाभूमीची प्रतिष्ठा जपावी

– डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील वादाचा विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना फटका; प्राचार्यपदाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी

The Exposer
नागपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील प्रशासकीय वाद संपुष्टात येण्याची चिन्हे अद्याप दिसत नसून, या संघर्षाचा विपरीत परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. महाविद्यालयातील परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असून, शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्यासाठी संबंधित व्यवस्थापन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सक्षम प्रशासकीय यंत्रणेने तातडीने स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालय परिसरात वारंवार पोलिसांची वाहने तसेच खासगी सुरक्षारक्षक अथवा बाऊन्सर्स दिसत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीवरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिक्षणाचे केंद्र असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि निर्भय वातावरण मिळणे आवश्यक असताना प्रशासकीय संघर्षामुळे मूळ शैक्षणिक उद्देशच बाजूला पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाविद्यालयाच्या सूचना फलकावर विविध गटांकडून परस्परविरोधी सूचना आणि नोटिसा लावल्या जात असल्याने कर्मचारी संभ्रमात असल्याचे सांगण्यात येते. नेमके कोणाचे आदेश अधिकृत मानावेत, प्रशासकीय कामकाजासाठी कोणाकडे जावे आणि आवश्यक कागदपत्रांवर कोणाची स्वाक्षरी घ्यावी, असे प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाल्याचा दावा आहे.

दरम्यान, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालय रिकामे करून घरी जाण्याच्या मौखिक सूचना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सूचनांनंतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय सोडल्याचे सांगण्यात येते. मात्र, अशा सूचना कोणत्या प्रशासकीय अधिकारांतर्गत देण्यात आल्या, याबाबतही कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कार्यकारी प्राचार्यपदाच्या प्रस्तावावरून संभ्रम

कार्यकारी प्राचार्यपदाच्या मान्यतेशी संबंधित प्रस्तावाबाबतही वाद कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, विद्यापीठाने १५ मार्च २०१२ च्या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत सुधारित अथवा नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर व्यवस्थापनाच्या अध्यक्षपदाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.

प्राचार्यपदासाठी आवश्यक सेवाज्येष्ठता यादी, पात्रता, विद्यापीठाची मान्यता आणि अधिकृत प्रशासकीय प्रक्रिया याबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. संबंधित सर्व कागदपत्रांची विद्यापीठाने निष्पक्ष तपासणी करून अधिकृत प्राचार्य कोण, याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत, जेणेकरून महाविद्यालयातील दुहेरी आदेशांची स्थिती संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

काही जाणकारांच्या मते, पूर्वीच्या प्राचार्यांना देण्यात आलेली विद्यापीठाची मान्यता अद्याप वैध असल्यास त्याबाबत विद्यापीठाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. अन्यथा नियमानुसार नव्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून प्राचार्यपदाचा वाद कायमस्वरूपी निकाली काढावा. कोणत्याही व्यक्ती अथवा गटाच्या हितापेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि संस्थेचे हित सर्वोच्च मानले जावे, असा सूर व्यक्त होत आहे.

वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा

महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप प्राप्त झाले नसल्याचा आरोप असून, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन आर्थिक नियोजनावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय वादात कोणताही सहभाग नसताना कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि महाविद्यालयाचे नियमित कामकाज या बाबींना कोणत्याही अंतर्गत वादापासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे. वेतनासंबंधी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

भंतेजींपर्यंत संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचते का?

महाविद्यालयाच्या कारभारासंदर्भात भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यापर्यंत सर्व कागदपत्रे, विद्यापीठाच्या सूचना, सेवाज्येष्ठतेची माहिती आणि प्रशासकीय प्रक्रियेचे संपूर्ण व वस्तुनिष्ठ स्वरूप पोहोचवले जाते का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

भंतेजींना स्थानिक भाषांतील प्रशासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांचा अचूक आशय स्वतंत्र व निष्पक्ष माध्यमातून समजावून सांगितला जावा. त्यांच्या स्वाक्षरीपूर्वी प्रत्येक कागदपत्राचे अधिकृत भाषांतर, कायदेशीर परिणाम आणि प्रशासकीय पार्श्वभूमी स्पष्ट केली जावी. यामुळे गैरसमज दूर होतील आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याची संधी मिळणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भंतेजींच्या नावाचा वापर करून कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे पद, प्रभाव किंवा प्रशासकीय नियंत्रण मजबूत करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच भंतेजींना अपूर्ण अथवा एकतर्फी माहिती दिली जात असल्याचे आरोप असतील, तर त्यांचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

समितीतील अनुभवी सदस्यांनी मौन सोडावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतील उच्चशिक्षित आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या सदस्यांनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाविद्यालयातील कर्मचारी अडचणीत असताना, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना आणि दीक्षाभूमीच्या प्रतिष्ठेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना अनुभवी सदस्यांचे मौन चिंताजनक असल्याची भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

समितीतील सर्व सदस्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांचे हित, कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि संस्थेची प्रतिष्ठा यांना प्राधान्य द्यावे. आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

भंतेजींनी चिवराचा सन्मान आणि जनविश्वास सर्वोच्च ठेवावा

भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनेक दशकांपासून धार्मिक, सामाजिक आणि धम्मकार्याच्या माध्यमातून देशभरात आदराचे स्थान निर्माण केले आहे. भगवान गौतम बुद्धांचे करुणा, प्रज्ञा, मैत्री, समता आणि शांततेचे विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. भंते ससाई यांच्याकडे मोठ्या आदराने बघितले जाते.

त्यामुळे त्यांनी कोणत्याही व्यक्ती अथवा गटाच्या प्रभावाखाली न जाता, सर्व बाजूंची निष्पक्ष माहिती घेऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पद, प्रतिष्ठा अथवा प्रशासकीय अधिकारांच्या संघर्षापेक्षा चिवराची प्रतिष्ठा, धम्माची मूल्ये आणि समाजाने दाखविलेला विश्वास अधिक महत्त्वाचा आहे.

भंतेजींनी धार्मिक आणि धम्मकार्याला सर्वोच्च प्राधान्य देत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा देशभर अधिक व्यापक प्रसार करण्यावर भर द्यावा. त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनमानसातील सन्मानाचा उपयोग समाजात शांतता, बंधुता, समता आणि करुणेचा संदेश पोहोचविण्यासाठी व्हावा. कोणाच्याही हातचे बाहुले बनल्याचा संशय निर्माण होणार नाही, अशा पारदर्शक आणि स्वतंत्र भूमिकेतून त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी सन्मानपूर्वक अपेक्षा जनमानसातून व्यक्त व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More