ताजुद्दीन बाबांच्या उर्सनिमित्त ‘शाही संदल’साठी झोन-३ सज्ज

– कडेकोट बंदोबस्ताबाबत पोलिसांना मार्गदर्शन; तहसील, कोतवाली व गणेशपेठ परिसरात रूट मार्च

The Exposer
नागपूर : ताजुद्दीन बाबांच्या सुरू असलेल्या उर्स उत्सवानिमित्त उद्या आयोजित करण्यात आलेल्या ‘शाही संदल’च्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांच्या झोन-३ अंतर्गत तैनात सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार हा बंदोबस्त आढावा व रूट मार्च आयोजित करण्यात आला. उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या उपक्रमात झोन-३ चे पोलीस उपायुक्त, लकडगंज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, कोतवाली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तसेच झोन-३ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

बंदोबस्ताच्या मार्गदर्शनादरम्यान शाही संदल मिरवणुकीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तैनाती, गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. शाही संदल शांततेत आणि सुरळीत पार पडावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला.

नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच प्रत्यक्ष क्षेत्रातील बंदोबस्त व पूर्वतयारीची पाहणी करण्याच्या उद्देशाने तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला.

ताजुद्दीन बाबांचा उर्स आणि शाही संदल शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागपूर शहर पोलीस कटिबद्ध असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नागपूर शहर पोलिसांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More