– अपहरणाच्या संशयाने पोलिस यंत्रणा तत्काळ अलर्ट; काही मिनिटांत कारचा घेतला शोध
The Exposer
नागपूर : मनीषनगर परिसरातून भरधाव जाणाऱ्या लाल रंगाच्या कारमधून एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने अपहरणाचा संशय निर्माण झाला. एका जागरूक नागरिकाने तत्काळ कारचा व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला. मात्र, हा व्हिडीओ बेलतरोडी पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी दाखविलेली सतर्कता आणि कार्यतत्परता कौतुकाचा विषय ठरली.

ही घटना बेलतरोडीहडीत सकाळी अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारासचा असल्याचे म्हटले जाते. लाल रंगाची कार भरधाव वेगाने जात असताना त्यामधून मुलीच्या ओरडण्यासारखा आवाज ऐकू आला. त्यामुळे संबंधित नागरिकाला कारमधून एखाद्या मुलीचे अपहरण करून नेले जात असल्याचा संशय आला. संभाव्य गंभीर प्रकार लक्षात घेऊन त्यांनी जागरूक नागरिकाची भूमिका बजावत कारचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला.
काही मिनिटांतच हा व्हिडीओ बेलतरोडी पोलिसांपर्यंत पोहोचला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी विविध शोध पथके तयार करून लाल कारच्या शोधासाठी रवाना करण्यात आली.
पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि उपलब्ध तपशीलांच्या आधारे वेगाने तपास करीत अल्पावधीतच संबंधित कारची ओळख पटविली. त्यानंतर पोलिस पथकाने कारमालकाचे घर गाठून कारमधील तरुण-तरुणींबाबत चौकशी केली.
चौकशीत मात्र अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. कारमधील मुलगी आणि तिचे मित्र एकमेकांसोबत हसत-खेळत व मस्ती करीत प्रवास करत होते. मस्तीच्या वेळी मुलीने केलेला आवाज बाहेरून ओरडण्यासारखा ऐकू आल्याने संबंधित जागरूक नागरिकाला अपहरणाचा संशय आला होता.
कारमधील सर्व जण मित्र-मैत्रिणी असून सर्व जण सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गैरसमजामुळे निर्माण झालेल्या या घटनेचा काही वेळातच छडा लावत बेलतरोडी पोलिसांनी संभाव्य गंभीर प्रकाराबाबत दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
दरम्यान, संबंधित तरुण-तरुणींच्या पालकांनीही पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल आणि तातडीच्या कारवाईबद्दल आभार व्यक्त केले. एखाद्या मुलीच्या सुरक्षिततेशी संबंधित संशयास्पद माहिती मिळताच कोणताही वेळ न दवडता पोलिसांनी केलेल्या वेगवान कारवाईचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
या घटनेत अपहरणाचा प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले असले, तरी बेलतरोडी पोलिसांनी माहितीची सत्यता पडताळण्यासाठी दाखविलेली तत्परता महत्त्वाची ठरली. नागरिकांची जागरूकता आणि पोलिसांची कार्यतत्परता यांचा सकारात्मक समन्वय या घटनेतून दिसून आला. बेलतरोडी पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे नागरिकांच्या मनातील पोलिसांप्रती विश्वासाची भावना पुन्हा एकदा अधिक दृढ झाली आहे. या घटनेच्या माहितीसाठी बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
Author: संतोष तायडे
संपादक











