पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त; सहा महिन्यांनंतरही होमगार्ड मानधनाच्या प्रतीक्षेत!

– नागपूर मनपा निवडणुकीत सहा दिवस बजावली सेवा; १२०० ते १५०० होमगार्ड जवानांचे लाखो रुपयांचे मानधन रखडले

– पोलिसांना नियमित वेतन; होमगार्डच्या हक्काच्या मोबदल्याला मात्र विलंब का? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेण्याची मागणी

The Exposer
नागपूर : कायदा व सुव्यवस्था राखणे असो, निवडणूक बंदोबस्त असो, धार्मिक उत्सव, मोर्चे, आंदोलने किंवा आपत्कालीन परिस्थिती असो—राज्यातील होमगार्ड जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यात होमगार्ड विभागाचे मोठे योगदान आहे. मात्र, कर्तव्य बजावूनही या जवानांना त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचा गंभीर प्रकार नागपुरात समोर आला आहे.

जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीला जवळपास सहा महिने पूर्ण झाले आहेत. या निवडणुकीदरम्यान नागपूर शहरातील अंदाजे १२०० ते १५०० होमगार्ड जवानांनी सलग सहा दिवस पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत निवडणूक बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली. पोलिस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील विविध झोनमध्ये पोलिसांसोबत होमगार्ड जवानांचीही बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीला सहा महिने उलटूनही या जवानांना सहा दिवसांच्या बंदोबस्ताचे मानधन अद्याप मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, होमगार्ड जवानांना ड्युटीच्या दिवसांनुसार कामाचा मोबदला म्हणून प्रतिदिन १,२८५ रुपये मानधन दिले जाते. विविध कपातींनंतर त्यांच्या हातात प्रतिदिन सुमारे १,२५० रुपये मिळतात. त्यानुसार सहा दिवसांच्या निवडणूक बंदोबस्तासाठी एका होमगार्ड जवानाला अंदाजे ७,५०० रुपये मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सहा महिने उलटूनही हा हक्काचा मोबदला न मिळाल्याने संबंधित जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

होमगार्ड जवानांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित मासिक वेतन मिळत नाही. त्यांनी प्रत्यक्ष बजावलेल्या कर्तव्याच्या दिवसांनुसार त्यांना मानधन दिले जाते. त्यामुळे हे मानधनच अनेक होमगार्ड जवानांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे. वाढती महागाई, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च आणि दैनंदिन गरजा भागविताना त्यांना मोठी आर्थिक कसरत करावी लागत आहे.

एकीकडे शासन होमगार्ड जवानांकडून निवडणुका, सण-उत्सव, मोर्चे, आंदोलने तसेच विविध संवेदनशील प्रसंगी जबाबदारीची कामे करून घेते; मात्र दुसरीकडे त्यांनी प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याचा मोबदला सहा-सहा महिने रखडविला जात असेल, तर ही बाब शासनाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

कर्तव्य बजावताना होमगार्ड जवानांकडून तत्परता अपेक्षित ठेवायची; मात्र त्यांच्या हक्काचे मानधन देताना विलंब करायचा, हे कोणते न्याय्य धोरण? निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जवानांना स्वतःच्या मेहनतीच्या पैशांसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही बाब संवेदनशील आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या भूमिकेशी विसंगत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सेवेचा सन्मान राखत मानधन वेळेवर मिळावे

होमगार्ड हे केवळ पोलिसांचे पूरक मनुष्यबळ नसून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहेत. पोलिस दलासोबत उन्हात, पावसात आणि अनेकदा तणावपूर्ण परिस्थितीत ते कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या सेवेचा योग्य सन्मान राखत मानधन वेळेत देण्यासाठी कायमस्वरूपी, पारदर्शक आणि कालबद्ध व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

होमगार्ड जवानांकडून आवश्यकतेनुसार तत्काळ सेवा घेतली जाते. त्यामुळे त्यांनी कर्तव्य पूर्ण केल्यानंतर त्यांचे मानधनही निश्चित कालमर्यादेत अदा होणे अपेक्षित आहे. मानधनासाठी जवानांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी शासन आणि संबंधित विभागाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरातच अंदाजे १२०० ते १५०० होमगार्ड जवानांचे निवडणूक बंदोबस्ताचे मानधन सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याने या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून होमगार्ड जवानांचे थकीत मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. तसेच भविष्यात कर्तव्य बजावल्यानंतर मानधनासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा होमगार्ड जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More